उपोषण सशर्त सुटलं, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

0
19

जालना-मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेले उपोषण सोडविण्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आलं. जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला आहे. (Maratha Reservation Agitation) तब्बल १७ दिवसानंतर उपोषणाचा हा तिढा सुटला असून जरांगे यांनी दवाखान्यात दाखल होण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती देखील त्यांनी मान्य केली. यानंतर मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले व त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी देखील आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. विशेष म्हणजे आमरण उपोषण मागे घेतले असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचं जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिले. देवेंद्र फडणवीस, मी आणि अजित पवार यांच्यात पत्रकार परिषदेबद्दल चर्चा सुरू होती व माध्यमांनी त्याचा शेंडा आणि बुडूक काढून दाखवले, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. माध्यमांवर आमचा विश्वास आहे, पण त्यांनीच विश्वासघात करु नये, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारचे पूर्ण प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. इतर समाजाने समजून घेण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मराठा समाज अतिशय शिस्तप्रिय आहे. लाठीमारामुळे गालबोट लागले व यात ज्यांचा दोष होता त्यांना निलंबीत केले आहे. इतकेच नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जाहीर माफी मागितली आहे. घटनेबद्दल मलाही खंत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
काय म्हणाले जरांगे?
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, जीव गेला तरी चालेल, पण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. सरकारचा एक महिन्याचा प्रस्ताव होता. समाजाच्या वतीने मी दहा दिवस जास्त देतो, पण मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असेही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांचे वडील देखील उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना देखील ज्युस देण्यात आला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा