
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची या आठवड्यातील बैठक (Maharashtra State Cabinet) उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार असून या बैठकीत मराठवाड्यासाठी पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रामुख्याने सिंचनाच्या मोठ्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. बऱ्याच वर्षानंतर ही बैठक संभाजीनगरमध्ये होत आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयासाठी आणण्यासाठी विविध प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या प्रस्तावांवर अंतिम तयारी सुरु आहे. मराठवाड्यासाठी सुमारे तीस ते ४० हजारांचे पॅकेज जाहीर होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. यात दुष्काळग्रस्त मराठवाड्यात नदीजोड प्रकल्पाला चालना देण्याच्या प्रस्तावांचा समावेश आहे. काही बंद पडलेल्या सिंचन प्रकल्पांना अधिक निधी देऊन त्यांनाही चालना दिली जाण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सोयाबीन रिसर्च सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय मेडिकल व कृषी कॉलेजचे प्रस्तावही आहेत. तेही या निमित्ताने मार्गी लावण्याचे प्रयत्न आहेत. बैठकीत कोणते विषय मान्यतेसाठी घ्यायचे, हा निर्णय घेण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
