
विरोधी पक्षांच्या आईएमईआई या आद्याक्षरानी सुरू होणाऱ्या आघाडीने आपल्या 2024च्या निवडणूक प्रचाराची सुरूवात पत्रकारांवरील बहिष्काराने सुरू केली आहे.त्यासाठी आघाडीने देशातील वृत्तवाहिन्यांवरील लोकप्रिय चौदा पत्रकारांची नावेही अधिकृतपणे जाहीर केली आहेत.या पत्रकारांपैकी कुणाचाही सहभाग ज्या चर्चेत असेल त्या चर्चेत आयएनडीएचे प्रवक्ते सहभागी होणार नाहीत असे या बहिष्काराचे स्वरूप आहे.
या चौदा पत्रकारांमध्ये आजतकचे सुधीर चौधरी व चित्रा त्रिपाठी, रिपब्लिकचे संपादक अर्णव गोस्वामी, टाईम्स नाऊच्या नाविका कुमार, एबीपी न्यूजच्या रूबिका लियाकत यांच्यासह अदिती त्यागी,अरूण चोप्रा,आशीष देवगण,आनंद नरसिंहन, अशोक श्रीवास्तव,गौरव सावंत,प्राची पाराशर,शिव अरूर व सुशांत सिन्हा यांचा समावेश आहे.

आघाडीने बहिष्काराचे कारण दिले नसले तरी या पत्रकारांच्या अडचणीच्या प्रश्नाना उत्तरे देताना विरोधी पक्षांच्या प्रवक्त्यांची फे फे होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असावा असा अंदाज आहे. अशा प्रकारे ठराविक पत्रकारांवर त्यांची नावे घेऊन अधिकृतपणे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा केवळ भारतातीलच नव्हे तर लोकशाही असलेल्या देशांमधील पहिलाच प्रकार असावा.मोदी सरकारवर पत्रकारांची गळचेपी करण्याचा आरोप करणार्या आयएनडीएने हा निर्णय घ्यावा याची माध्यमक्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटली असेल तर ते स्वाभाविकच आहे.एरव्ही पत्रकारांच्या कथित गळचेपीच्या विरोधात गये काढणारी एडिटर्स गिल्ड या बहिष्कारावर कोणती भूमिका घेते याकडे माध्यम जगताचे लक्ष लागले आहे.विरोधी पक्षांनी आपल्या निवडणूक प्रचाराची नकारात्मक सुरूवातच या बहिष्काराने करून आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य कसे बेगडी आहे हे दाखवून दिले आहे.मी या प्रकाराचा तीव्र निषेध करीत आहे.
ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर