
छत्रपती संभाजीनगर-छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे. या बैठकीत मराठवाड्यासह राज्यासाठी कोणते महत्वाचे निर्णय घेतले जातात, याकडे लक्ष लागले आहे. आमखास मैदानाजवळील स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक सुरु झाली असून त्यात मराठवाड्यासाठी पॅकेजचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मराठवाड्यासह काही भागात दुष्काळाचे संकेत मिळत असताना त्यावर राज्य सरकार काय उपाययोजना करणार याकडेही राज्याचे लक्ष लागलेले आहे. मराठवाड्यासाठी सिंचनाचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांना आजच्या बैठकीत मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. या माध्यमातून मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला बळ मिळेल, अशी आजच्या बैठकीतून अपेक्षा आहे. येथील पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे २ हजार ७८४ कोटी रुपयांची महत्त्वकांक्षी योजना मंजूर केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.