तलावात गणेश विसर्जनाला बंदी शहरात मनपाचे ४१३ विसर्जन टँक

0
12

 

नागपूर : मंगळवारी सुरू होणाऱ्या श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महानगरपालिकेची तयारी पूर्णत्वास आलेली असून शहरातील विविध भागांमध्ये एकूण ४१३ विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलावांमध्ये विसर्जनाला पूर्णत: बंदी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी मनपातर्फे शहरातील प्रमुख तलावांचे परिसर तसेच अन्य ठिकाणी एकूण ४१३ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव, सोनेगाव तलाव, गांधीसागर तलाव, पोलिस लाईन टाकळी तलाव, सक्करदरा तलाव, नाईक तलाव या तलावांच्या परिसरामध्ये विसर्जन टँक उभारण्यात येत आहेत. या विसर्जन टँकमध्ये ४ फुट किंवा त्यापेक्षा कमी आकाराच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कोराडी तलाव परिसरामध्ये मोठ्या आकाराचे कृत्रिम टँक निर्माण करण्यात आले आहे. या टँकमध्येच ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींचे विसर्जनासह मनपाद्वारे परवानगी देण्यात आली आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात तयारी सुरू आहे.
दरम्यान, दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी ३२ विसर्जन टँक, तीन दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी २१ विसर्जन टँक, पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी ४६ विसर्जन टँक, सात दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी ४४ विसर्जन टँक आणि नऊ व दहा दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी ४१३ विसर्जन टँकची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली आहे.
सर्व विसर्जन स्थळी निर्माल्य कलशांची व्यवस्था असणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा