नेत्यांची मुले कोणाचे भले, कोणाचे वाटोळे!

0
17

 

आजही तेच जे पूर्वापार चालत आलेले आहे म्हणजे मुले रावणासारखी निपजली किंवा घडविल्या वाढविल्या गेली तर अशा कुटुंबांचा अंत नाश नक्की आहे निश्चित आहे आणि मुले उत्तम संस्कारातून घडली वाढली मोठी झाली तर पुढल्या पिढ्या आपोआप पूर्वजांच्या पुण्याईने आणि जपलेल्या उत्तम संस्कारातून वाढत जातात मोठ्या होतात समाधान मिळते. सतत पैसे राजकीय डावपेच विविध व्यसने जनतेची कायम फसवाफसवी आणि व्यक्तिगत स्वार्थ यातून आपल्या या राज्यातली बहुतेक राजकीय घराणी घडली वाढली त्यामुळे आज जेव्हा मी ” नेत्यांची आजची पिढी ” या विषयाला हात घातला तेव्हा असे लक्षात आले कि फारसे कुठलेही राजकीय नेत्यांचे घर सुखी समाधानी नाही कारण राजकारणात आलेली त्यांची पुढली पिढी बापाच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात उतरल्याने उन्मत्त आहे, व्यसनाधीन आहे, फार क्वचित घराणी उत्तम संस्कारांना जपून असल्याने त्यांचे तेवढे पुढे देखील भले होईल असे दिसते पण बहुतेक घराण्यातून बिघडलेली माजलेली पिढी जन्मली असल्याने या अशा पापातून प्रचंड कमाई केलेल्या घराण्यांचा नाश नक्की आहे…

कोठे थांबायचे हे ज्यांना समजले ते नक्की पिढी जातील पुढल्या उत्तम पिढ्या जन्माला घालतील पण थांबायचे नाही फसवायचे आहे असे मग ते व्यापारी असतील अधिकारी असतील नेते असतील दलाल असतील मीडियातले असतील अन्य कुठल्याही क्षेत्रातले असतील अशांचा अंत आणि अस्त नक्की वाईट आहे. कमाईच्या बाबतीत ज्यांना आपण मूर्ख समजत होतो किंवा ज्यांच्या साधेपणाची प्रसंगी राष्ट्र्वादीतले देखील खिल्ली उडविताना मी स्वतः बघितले आहे ते आर आर पाटील अकाली गेले पण जातांना पोटच्या मुलांवर पत्नीवर उत्तम संस्कार करून गेल्याने अख्खे कुटुंब कौतुक करावे या पद्धतीने जगते वागते आहे त्याचवेळी आदित्य बरा कि तेजस यास राजकारणात उतरवून त्यास मोठे करावे, या गोंधळात उद्धव आणि रश्मी का अडकले आहेत याचे त्यांनी स्वतःच विचारमंथन करणे गरजेचे आहे. अगदी अलीकडे वाढदिवसानिमीत्ते नव्या मुंबईतल्या गणेश नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीची आठवण झाली, आधी उत्तम आणि यशस्वी कामगार नेते आणि पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले गणेश नाईक ते आजची त्यांची राजकारणात उतरणारी थेट तिसरी पिढी, लोकांच्या सतत भल्यासाठी वाहून घेतल्याने मला वाटते, गणेश नाईक यांच्या वाट्याला प्रसंगी राजकीय संघर्ष आला असेल पण व्यक्तिगत कौटुंबिक जीवनात नाईक घराण्याचे यश, मोहातून वाहत जाणाऱ्या इतर नेत्यांना मंत्र्यांना अधिकारयांना गणेश नाईक यांचा आजवरचा इतिहास आणि त्यांची वाटचाल, अभ्यासक्रमात ठेवावा, असे आवर्जून सांगावेसे वाटते…

अनेकदा मोठ्या कौतुकाने आदराने आनंदाने प्रेमाने किंवा भीतीपोटी अजित पवार यांचे मित्र किंवा समर्थक त्यांच्या शिस्तीचे स्वच्छतेचे कष्टाचे कामांचे वागण्या बोलण्याचे विशेष कौतुक करतांना आढळतात पण मी ज्या दृष्टिकोनातून अजित पवारांचा अगदी ते राजकारणात आल्या दिवसापासून ज्या पद्धतीने अभ्यास केला आहे करतो आहे, मला वाटते एखादा लबाड माणूस भलेहि त्याच्या निवडलेल्या क्षेत्रात प्रसंगी मोठे यश प्राप्त करून मोकळा होतो पण त्याचे नेमके वागणे बोलणे राहणे इत्यादींवर पोटच्या मुलांचे बारकाईने लक्ष असल्याने अशी मुले मात्र वडिलांची लबाडी धुडकावून लावतात आणि दुर्लक्ष करणार्या बापाच्या नकळत पुढे त्या बापाला डोकेदुखी ठरू शकतात म्हणूनच उद्धव यांना आदित्य कि तेजस किंवा अजित पवार यांना पार्थ कि जय, नेमका कोणावर विश्वास ठेवून पुढल्या सत्तेच्या किल्ल्या हाती द्याव्यात हा मोठा प्रश्न पडलेला असतो. महत्वाकांक्षी माय बापाची नेमकी वृत्ती आणि झालेले दुर्लक्ष, माझ्यासहित राज्यातल्या साऱ्याच अचानक श्रीमंत झालेल्या थोडक्यात पाप कमाईतून पुढे आलेल्या आई वडिलांसमोर हा असा यक्ष प्रश्न कायम पडलेला असतो. जळगावच्या ज्या राजमल लखीचंद घराण्यावर लक्ष्मी गेल्या अनेक पिढ्या एवढी प्रसन्न होती कि साठवलेले पैसे कुठे ठेवावेत हा त्यांना अनेक वर्षे प्रश्न पडलेला होता पण पुढे ईश्वरबाबू जैन आणि मनीष जैन दोघेही राजकारणात उतरले आणि एकमेकांच्या संघर्षातून आज आर्थिक दृष्टया जेव्हा बऱ्यापैकी रस्त्यावर आले किंवा नेमके जे सुरेशदादा जैन यांच्याही कुटुंबात आर्थिक दृष्ट्या घडले, राज्यातल्या इतर राजकीय घराण्यांना किंवा मोठी कमाई करणाऱ्यांना तो एक मोठा धडा आहे जो सर्वांनी वाचून पाठ करावा आणि आदर्शाचे नेमके कित्ते घडवावेत. अजित पवारांच्या सतत सभोवताली असणाऱ्या सुनील तटकरे, प्रमोद हिंदुराव, अविनाश आदिक सारख्या त्यांच्या जिवलगांनी मी सांगितले त्यात नेमके तथ्य कसे, इतरांना अवश्य सांगावे…

हेमंत जोशी

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा