
नवी दिल्ली : मोदी सरकारने ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षित असे महिला आरक्षणाचे विधेयक मंत्रिमंडळात मंजूर केल्यावर हे विधेयक आज संसदेत मांडण्यात आले. नव्या संसद भवनातील पहिल्याच दिवशी हे विधेयक मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले. यानंतर सर्वांनी बाकं वाजवून या विधेयकाचे स्वागत केले.
(Women’s Reservation Bill) सोमवारी रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले होते. या विधेयकाचे काँग्रेससह बहुतांशी पक्षांनी स्वागत केले असून पाठिंबा जाहीर केला आहे. हे विधेयक संसदेकडून मंजूर झाल्यास लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे.
सध्या संसदेचे विशेष अधिवेशन सुरु असून या विशेष अधिवेशनातच हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. सरकारने विशेष अधिवेशन का बोलावले, असा प्रश्न विरोधी पक्षांसह साऱ्यांनाच पडला होत्या. त्यावर वेगवेगळे अंदाज लावले जात होते. कुछ बडा होनेवाला है..असा सूरही ऐकायला मिळत होता. मात्र, महिला आरक्षण विधेयकाच्या निमित्ताने आता कारण स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.
काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी महिला आरक्षणला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला असल्यामुळे संसदेमध्ये या विधेयकाचा मार्ग सुकर असल्याचे मानले जात आहे. या विधेयकाची कुणकुण लागल्याने काँग्रेसने कालच हे विधेयक आणण्याची मागणी केली होती. अनेक दशकानंतर हे विधेयक आता संमत होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.