
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वारणसीत आता क्रिकेट स्टेडियम होणार आहे. मोदी यांनी वाराणसी येथे आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तसेच सुनील गावस्कर, कपिल देव, दिलीप वेंगसरकर असे अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटू यावेळी उपस्थित होते. (Varanasi International Cricket Stadium).
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह उपस्थित होते. वाराणसीच्या गंजरी, राजतलब येथे 30 एकर जागेत सुमारे ४५० कोटी रुपये खर्चाने हे आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. या स्टेडियमच्या रचनेसंदर्भातील प्रेरणा ही भगवान शिवाकडून घेण्यात आली असून यासाठी विविध प्रकारच्या रचना विकसित केल्या जाणार आहेत. यात चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आवरण असेल, त्रिशुळाच्या आकाराचे फ्लड-लाइट (प्रकाश योजना), घाटाच्या पायऱ्यांवर आधारित आसन व्यवस्था, स्टेडियमच्या दर्शनी भागावर बिल्वपत्राच्या (बेलाच्या पानाच्या) आकाराचे धातूचे पत्रे बसवले जातील. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ही ३० हजार पर्यंत असेल, असे यावेळी सांगण्यात आले. या स्टेडियममुळे वाराणसीत रोजगार वाढतील, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.