गडकरी – फडणवीसाचे नागपूर पाण्यात का?

0

नागपूर पाण्यात जाईल असे कधी वाटले होते का? नेहमीच पाण्याची ओरड करणारे नागपूर शहर पाण्यात जाते. नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे 15-20 हजार घरांचे नुकसान होते. चारी बाजूला पाणीच पाणी जसे काही समुद्रच आला.

पाहता पाहता घरा, दारात, अंगणात पाणीच पाणी. नेहमी गरिबांच्या घरात जाणारे पाणी यावेळी भेदभाव न करता श्रीमंताच्या घरातही निमंत्रित पाहुण्यासारखे हिचखिच न करता घुसते तेव्हा विकास, विकास म्हटल्या जातो तो हाच का? हा प्रश्न गडकरी – फडणवीसाच्या नागपूरकराना सतावत आहे. जनेतेचा अक्रोश मात्र त्यांच्या ओठातून, तोंडातून बाहेर पडतांना मन सुन्न होते. घरा- दारातल्या पाण्याने त्यांच्या डोळ्यातील अश्रू डाटून आलेत अन आटलेत, पण घरातले पाणी, खराब झालेले अन्नधान्य, कपडे, फर्निचर, आलेला गाळ, दुर्गंधी अजून संपलेली नाही. गरीब – श्रीमंताच्या गाड्यातील पाणी अजून सुकलेले नाही. पाऊस हा कोणाच्या हातात नाही.

अंबाझरी लेआऊट, डागा लेआउट, कार्पोरेशन कॉलनी, शंकर नगर, रामदास पेठ, बर्डी, अजनी, नंदनवन, गोरेवाडासह अनेक झोपडपट्टी भाग, नागनदी वाहते त्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. 2 – 3 तासात 109 मिलिमीटर पाऊस झाला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाग नदीचे पात्र अतिक्रमण झाल्याने कमी पडल्यामुळे इतर वस्त्यांमध्येही पाणी शिरले ते 12-16 घंट्यासाठी.

या अगोदर मी 4 वर्षापासून अंबाझरीने धोक्याची घंटा वाजविली, या माध्यमातून अनेक प्रकारे प्रकाश टाकला होता. नागपूरातील सर्व वर्तमानपत्रासह सर्वच चॅनेलनी यावर माझी मुलाखत घेत प्रहार केला होता. अंबाझरीने धोक्याची घंटा वाजविली यावर MWRRA यांचेकडे जनहित याचिकाही दाखल केली होती.
मा. आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेसह अनेक तज्ञ मंडळीची अंबाझरीसह नागपूरातील तलांवासाठी देखरेख समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर मनपानी या आदेशाचे विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर कोरोना आला. अजूनही ती केस तशीच असल्याचे कळते.
त्यानंतर मनपात बैठक होवुन दिलेल्या अहवालातील काही काम करण्याची मान्यता देत त्यांनी हे काम पाटबंधारे विभागाला दिले. त्यानुसार क्षतिग्रस्त सांडव्याचे (स्पीलवेचे) काम करण्यात आले. अजूनही मातीच्या धरणाची डागडुजी केलेली नसल्याने खूप जास्त प्रमाणात धोका कायम आहे.
माझ्या सततच्या मागणीनुसार स्पिलवेचे काम झाले नसते तर आज जी परीस्थिती अंबाझरीच्या पाण्यानी नागपूरकराची झाली त्यापेक्षा भयानक परीस्थिती निर्माण झाली असती. आज जे 10 फूट पाणी रामदासपेठ, बर्डीत दिसले ते 20 ते 30 फूटापेक्षा जास्त असते. आज जो प्रलय दिसतो त्यापेक्षा महाभंयकर प्रलय झाला असता, तो वेळीच सांडवा दुरूस्त झाल्याने (स्पिलवे) नागपूर वाचले.
आज जे घडले ते जर घडू नये असे वाटत असेल तर खालील उपाय योजना राबविण्यात याव्यात. नागनदीवरील अतिक्रमण काढावे लागेल. अंबाझरीतील गाळ काढून क्षमता वाढवावी लागेल. नाल्या साफ करून पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील. घरापेक्षा जे सिमेंट रोड वर झाले ते डिझाईन बदलावे लागेल. सिमेंट पेव्हर लावतांना पाण्याचा निचरा जलद होण्याकरीता पेव्हर सिमेंट मध्ये न लावता काळ्या गिट्टी पावडर मध्ये लावल्यास पाणी जागोजागी काही प्रमाणात जमिनित मुरविता येवून पाण्याची गती कमी होण्यास मदत होईल. घरो घरी रेनवॉटर हार्वेस्टिंग झालेे असते तर पाण्याचा प्रवाह कमी होण्यास मदत झाली असती. या अगोदर अनेक शहरातील ढगफुटीचा अभ्यास करून उपाययोजना राबविल्या असत्या तर नुकसान टाळता आले असते पण घटना घडून गेल्यावर जागे होने याला काहीच अर्थ असतो.
आज घडलेला घटनेला नैसगिक अपत्ती हे गोडस नांव देवून सोडून देता येणार नाही. याकरीता सरकारी यंत्रणांनी जागरूक राहून काम करावे लागेल.

डॉ. प्रवीण महाजन,
जल अभ्यासक,
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी, महाराष्ट्र शासन.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत चला जाणूया नदीला राज्यस्तरीय समिती सदस्य, महाराष्ट्र शासन.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा