
(Sangli)सांगली- सांगली जिल्ह्यामध्ये गोटखिंडी हे असे गाव आहे की जेथे मुस्लीम समाजाने आपल्या मशिदीमध्ये श्रीगणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. गेल्या ४३ वर्षांपासून मुस्लीम समाज ही परंपरा जोपासत आहे. एकदा गोटखिंडी गावात झुंजार चौकामध्ये नेहमीप्रमाणे हिंदू बांधवांनी गणपती बसवला होता. पण त्यावेळी प्रचंड पाऊस झाला आणि मंडळामध्ये बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीवर पाणी गळू लागले.
तेव्हा त्या गणेश मंडळाच्या मागच्याच बाजूला असलेल्या मशिदीतील बुजुर्ग मंडळींनी गणपतीच्या मूर्तीला मशिदीत आणून ठेवण्यास सांगितले. गणपतीचे पावसापासून रक्षण केले. त्याच्या पुढच्या वर्षी गावात एक मीटिंग घेतली गेली आणि यापुढे या मशिदीतच गणपतीची स्थापना करण्याचे ठरले. दोन्ही समाजाने या निर्णयास मान्यता दिली. त्यामुळे आता दरवर्षी या मशिदीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होऊ लागली.

मुस्लिम बांधव या गणपतीची मनोभावे पूजा , आरती करून प्रसादाचे वाटप करतात. सर्व गावकरी यावेळी या कार्यक्रमामध्ये एकोप्याने सहभागी होतात अशी माहिती अब्दुल गनी, गणेश मंडळ सदस्य,दत्तात्रय बोंगाणे, गणेश मंडळ सदस्य यांनी दिली.