
चेन्नई-भारताच्या हरित क्रांतिचे जनक आणि थोर कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एम. स्वामीनाथन यांचे गुरुवारी चेन्नई येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते व मागील काही वर्षांपासून त्यांची प्रकृती साथ देत नव्हती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. (Dr M.S. Swaminathan passes away)
१९२५ मध्ये जन्मलेल्या डॉ. स्वामीनाथन यांचा भारतात हरितक्रांती घडविण्यात महत्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी ‘एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केलेली आहे. त्यातून संशोधनाचे मोठे कार्य चालते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय ते रॅमन मॅगसेसे पुरस्कार, जागतिक अन्न पुरस्काराचेही ते मानकरी ठरले आहेत. देशातील हरित क्रांतीचे श्रेय असलेल्या डॉ. स्वामीनाथन यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर देखील सरकारला मार्गदर्शन केले होते. त्यासाठी ते अनेकदा विदर्भातही येऊन गेले. स्वामीनाथन फाऊंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी प्रकल्पही चालविला जातो.
स्वामीनाथन यांचा जन्म तमिळमाडूमध्ये कुंभकोणम येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथनांवर चांगला परिणाम झाला. १९४३ मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले. केरळमधील महाराजस कॉलेजातून त्यांनी कृषिक्षेत्रातील पदवी घेतली. कृषिक्षेत्रात काम करावयाचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषि महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली. १९४७ साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. १९४९मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्त केली. युपीएसएसी ची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले होते. मात्र, त्यांनी पोलीस अधिकारी न होता कृषी क्षेत्रातच कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेतला. नेदरलॅंडमध्ये बटाट्याच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२ मध्ये पीएच.डी. केले आणि परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले. भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदळाच्या उत्पादनात भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. १९६० आणि १९७० च्या दशकात स्वामीनाथन यांच्या महत्त्वपूर्ण कार्याने भारतीय शेतीमध्ये क्रांती घडवून आणली, ज्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणावर दुष्काळ टाळण्यास आणि अन्न उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करण्यास मदत झाली.
