
अमरावती- रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाचा वेळेवर योग्य उपचार न केल्याचा आरोप करत अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुणालयात डॉक्टर आणि रुग्णामध्ये तुफान मारामारी झाली. दारापूर येथील एक रुग्ण काल सकाळी 9 च्या सुमारास रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र, त्या रुग्णांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुठलाही उपचार केला नाही. कोणतेही औषध डॉक्टरांनी दिले नसल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला असून याची विचारणा करायला गेलेल्या रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात जोरदार राडा झाला असून या राड्याचे रूपांतर नंतर तुफान मारामारीत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रात्री रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी गाडगे नगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि रुग्णालयाविरोधात तक्रार केली असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत. सध्या मारहाण केलेल्या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असून जखमी रुग्णावर उपचार सुरू आहेत.