
चंद्रपूर-छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे लंडनहून महाराष्ट्रात आणण्यासाठी करार करण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) हे १ ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास लंडनला रवाना होणार आहेत. ३ ऑक्टोबरला हा करार होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही ऐतिहासिक वाघनखे सध्या लंडनमध्ये रॉयल अँड अल्बर्ट म्युझियममधे आहेत. यासंदर्भात आज चंद्रपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी सांगितले की, वाघनखे आणण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील तीन वर्ष ही वाघनखे महाराष्ट्रात असतील, असे त्यांनी सांगितले. पुण्यातील शिवभक्त रॉयल ट्विस्ट प्रतिष्ठानच्या संचालकांनी यानिमित्ताने माझ्यासाठी एक विशेष पोषाख तयार केला आहे. वाघनखांसाठी सामजस्य करार करण्यासाठी जाताना हा पोषाख मी परिधान करावा, अशी त्यांची इच्छा आहे. याशिवाय महाराज जसा पोषाख घालायचे तसाच पोषाख ते तयार करुन लंडनच्या म्युझियममध्ये ठेवायला देणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. १६ नोव्हेंबरला वाघनखे लंडनहून महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. १७ नोव्हेंबरला सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघनखांची स्थापना केली जाणार आहे. १७ नोव्हेंबर २०२३ ते २४ ऑगस्ट २०२४ दरम्यान वाघनखे सातारा येथेच प्रदर्शनासाठी ठेवली जातील. १५ ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंत वाघनखे नागपूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील. एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या काळात वाघनखं कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील. नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२६ दरम्यान वाघनखे मुंबईतील छ्त्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जातील. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी वाघनखे पुन्हा लंडनला व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट वस्तुसंग्रहालयात पाठवली जाणार आहेत.