
अमरावती – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महानगरपालिकेच्या वतीने अमरावती शहरात स्वच्छ अमृत महोत्सव अभियानांतर्गत आज 1 तारीख, स्वच्छते साठी श्रमदान, 1 तास नुसार अभियान राबविण्यात आले. अमरावती शहरात आज सकाळी स्वच्छता रॅली काढण्यात आली. रॅलीत घोषणा देऊन स्वच्छता विषयावर नागरिकांमधे संदेश देण्यात आला. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने चौकाचौकात मुख्य रोडवर फळ, भाजी विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात येवून त्यांना प्लास्टिक वापर करू नये, यासाठी सक्त ताकीद देण्यात आली. नागरिकांना दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमीतकमी करून प्लास्टिक बंदी करण्याबाबतही जनजागृतीपर संदेश दिला. स्वच्छता अभियान मोहीम व वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. महानगरपालिकेच्या वतीने साफसफाई अभियान, आरोग्य शिबीर व इतरही उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी खासदार अनिल बोंडे यांनी स्वतः 1 तास श्रमदान करून मनपाच्या साफसफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांनी जीवनभर स्वच्छतेचे महत्त्व सांगितले, तेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृतीत उतरविले असून संपूर्ण भारत देश स्वच्छ राहील याची काळजी आम्ही सर्व घेत असल्याचे खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी सांगितले.
हिंगणघाट तालुक्यात राबविण्यात आली स्वच्छता मोहीम

वर्धा – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामध्ये “स्वच्छता हीच सेवा” या उपक्रमांतर्गत गावातील आठवडी बाजार , ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यात आले. स्वच्छता उपक्रम ग्रामपंचायतद्वारा गावामध्ये राबविण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय परिसर, आठवडी बाजार परिसरातील गावातील पदाधिकारी व अंगणवाडी सेविका यांनी झाडूने सर्व परिसर स्वच्छ केला. दोन तास स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळेस गावातील पदाधिकारी व अंगणवाडी सेविका, मदतनीस व गावातील नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुदेव मॉर्निंग क्लबकडून स्वच्छता अभियान
अकोला – “एक तास एक साथ” हा जो नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. या नाऱ्यासोबत गुरुदेव मॉर्निंग क्लबने पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये स्वच्छता अभियान राबवले. सकाळची सुरुवात स्वच्छता अभियानाने केली असून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा परिसर स्वछ केला आहे. हे अभियान राबविण्यात गुरुदेव मॉर्निंग क्लब सोबत श्रीराम क्लब, हास्य क्लब यांनीही या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
आमदार प्रवीण पोटे यांचा स्वच्छता मोहीमेत सहभाग
अमरावती- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या “स्वच्छता हीच सेवा” या अभियानांतर्गत आज एक दिवस-एक तास श्रमदान करण्यात आले. या मोहिमेंतर्गत पोलीस अधिक्षक कार्यालय, आमदार प्रवीण पोटे, पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांनी अमरावती शहराच्या परिसरातील “स्वच्छता हीच सेवा” उपक्रमांतर्गत एक दिवस-एक तास श्रमदान करूया, या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.