
बुलढाणा BULDHAN – झोपडीत आराम करीत असलेल्या कामगारांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा-मलकापूर महामार्गावर उघडकीस आली आहे. या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. Buldhana Accident Speeding Truck Crushed 7 Labours Sleeping Near Road
बुलढाणा जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नांदुरा-मलकापूर महामार्गावरून जात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीला धडक दिली. ही घटना घडली त्यावेळी काही मजुर झोपडीत होते. ते ट्रकच्या चाकांखाली आले व तिघा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. यात २६ वर्षीय तरुण प्रकाश बाबू जांभेकर व पंकज तुळशीराम जांभेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर १८ वर्षीय युवक अभिषेक रमेश जांभेकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर तो फरार असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे मजुर महामार्गाच्या कामासाठी येथे होते व झोपडीत झोपलेले होते. दरम्यान, तज्ञ डॉक्टरांची एक टीम जखमी आदिवासी मजुरांवर उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिली आहे.