पत्रकारितेतील चिनी पैशाला लगाम

0

 

ल. त्र्यं. जोशी
ज्येष्ठ पत्रकार

दिल्ली पोलिसांनी आज मंगळवारी सकाळी अवैध चिनी पैशाच्या बळावर पोसल्या जाणार्या न्युज क्लिक नावाच्या वृत्तसंस्थेतील पत्रकाराना दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने केलेली अटक म्हणजे पत्रकारितेतील चिनी पैशाला लगाम लावण्याचा प्रयत्न होय. दोन महिन्यांपूर्वी न्युयार्क टाईम्स या अमेरिकेतील दैनिकाने दिलेल्या बातमीच्या आधारे सखोल चौकशी करून ही कारवाई करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांचे या संदर्भात म्हणणे आहे. न्युयार्क टाईम्सच्या वृत्तानुसार चीनकडून न्युज क्लिकमधील पत्रकाराना गैरमार्गाने अमाप पैसा देऊन त्याना भारतविरोधी प्रचारात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने ही कारवाई करण्यात आली. शेवटी राष्ट्रीय सुरक्षा व पत्रकारांवरील कारवाई या दोनपैकी एकाची निवड करायची झाल्यास राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणेच भाग आहे अशी या संदर्भात दिल्ली पोलिसांची भूमिका आहे.इडीसारख्या तपास यंत्रणांनी सखोल तपास केल्यानंतर व चीनकडून या वृत्तसंस्थेतील पत्रकाराना प्रचंड पैसा देण्यात येत असल्याचे निष्पन्न निघाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे. तपासानंतर तयार केलेल्या अहवालाच्या आधारावरच ही कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्लीहून आलेल्या वृत्तानुसार दिल्ली पोलिसानी आज सकाळीच न्युज क्लिकचे नवी दिल्लीतील प्रमुख पुरकायस्थ, अभिसार शर्मा व भाषा सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणि कथित अॅक्टिव्हिष्ट तीस्ता सेटलवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन जाऊन त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल व काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली व त्याना ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईच्या विरोधात राजदीप सरदेसाई, प्रेस क्लब व डाव्या पत्रकारांनी पत्रकारांच्या कथित गळचेपीबद्दल गळा काढला असला तरी गेल्या आठवड्यात काॅग्रेस पक्षाने दिल्लीतील चौदा पत्रकारांवर बहिष्कार टाकला तेव्हा राजदीपसह डाव्या पत्रकारानी मुखात शाळिग्राम धरला होता हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.
सकाळच्या कारवाईच्या संदर्भात पत्रकारानी माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता या कारवाईशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचे त्यानी स्पष्ट केले.तपास यंत्रणांनी या संदर्भात त्याना मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली असावी असे ते म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा