
आज इंग्लंड वि. न्यूझीलंड
(Ahmedabad)अहमदाबाद : आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाला आजपासून सुरुवात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर स्पर्धेचा पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि गतवेळचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यात लढला जाणार आहे. (ODI World Cup) दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ मानले जात आहेत. २०१९ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर चौकार जास्त असणाऱ्या इंगलंडला विजयी घोषीत केले होते. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी किवी मैदानात उतरतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुखापतीमुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा देखील दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये चार सामन्याची एकदिवसीय मालिका पार पडली होती. न्यूझीलंड संघाने पहिला सामना जिंकला होता. पण त्यानंतर इंग्लंडच्या संघाने वादळी कामगिरी करुन उर्वरित तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकले होते. अखेरच्या दोन्ही सामन्यात इंग्लंडने 300 पेक्षा जास्त धावा केल्या. वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यातही 300 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर लाल आणि काळ्या मातीने अनेक खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. काही खेळपट्ट्यांवर गोलदाजांना मदत मिळते तर काहींवर धावा जास्त निघतात.

दोन्ही संघ तुल्यबळ
एकदिवसीय सामन्यांमध्ये (England)इंग्लंड आणि (New Zealand)न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत ९५ सामने झाले आहेत. त्यामध्ये इंग्लंडने ४५ तर न्यूझीलंडने ४४ सामन्यांत विजय मिळवला आहे. चार सामन्याचा निकाल लागला नाही, तर दोन सामने बरोबरीत सुटले होते.