रुग्णांच्या मृत्यूंची सीबीआय चौकशी

0

मुंबई MUMABI – “राज्यातील काही रुग्णालयांत लोकांचे मृत्यू होत असल्याने मी अस्वस्थ आणि उद्विग्न आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजलेले असून स्थिती पाहून संताप येतोय. कोरोनाच्या संकटाचा याच आरोग्य यंत्रणेने सामना केला होता. परंतु सरकार बदलताच महाराष्ट्राची दुर्दशा चव्हाट्यावर आली असून नांदेड, संभाजीनगर आणि नागपूर येथे झालेल्या मृत्यूंची सीबीआय चौकशी करावी”, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही शहरांमधील शासकीय रुग्णालयांत रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यातच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या विषयावर भूमिका मांडली. सरकारकडे यांच्या जाहिराती करायला, गुवाहाटी-गुजरातला मौजमस्ती करायला पैसे आहेत. गोव्यात टेबलावर नाचायला पैसे आहेत. परंतु राज्यातील सामान्य लोकांचे जीव वाचवण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे या सरकारचीच सीबीआय चौकशी करण्याची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले. केवळ पोस्टर्स किंवा बॅनरवर दिसतील, असे आरोग्यमंत्री यांच्याकडे आहेत. जाहिराती, आमदार-खासदारांची अदलाबदली करायला यांच्याकडे पैसे आहेत, परंतु औषधं खरेदी करायला पैसे नाहीत, हे सगळं संतापजनक असून यांची चौकशी व्हायला हवी, अशी टीका करून ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा