
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्षावर शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (NCP Sharad Pawar Group in SC) शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा गटाच्या सर्व आमदारांविरोधात याचिका दाखल केली असून या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेत केली आहे.
राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भात आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यापूर्वी शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर आपली भूमिका मांडली होती. आयोग एकांगी भूमिका घेत असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या वकिलांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली नाही. विधीमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष हे वेगळे आहेत. तरीही निवडणूक आयोग राष्ट्रवादीत फूट पडली असल्याचे म्हणत आहे, असा शरद पवार गटाचा दावा आहे.
अजित पवार यांनी गेल्या जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी बड्या नेत्यांनीही शरद पवार यांची साथ सोडली होती. त्यानंतर ही मंडळी भाजप – शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाली आहे.