शरद पवार मर्जीनं पक्ष चालवतात-अजित पवार गट

0

नवी दिल्ली- शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा गंभीर आरोप अजित पवार गटाने निवडणूक आयोगापुढे (Election Commission of India) केला असल्याची माहिती आहे. जयंत पाटील यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्ती कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची निवडच बेकायदा आहे, असा दावाही या गटाकडून करण्यात आलाय. राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या दाव्यांवर दिल्लीत निवडणूक आयोगापुढे सुनावणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे स्वतः शरद पवार हे या सुनावणीला हजर आहेत. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार वंदना चव्हाण या ही निवडणूक आयोगात दाखल झाल्या आहेत. या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटावर हा गंभीर आरोप करण्यात आलाय. अजित पवार गटानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्याआधीच जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती कशी होऊ शकते, असा सवाल अजित पवार गटाकडून करण्यात आला. केवळ एका पत्राद्वारे जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली, असा आक्षेपही घेण्यात आला.
अजित पवार गटाने आयोगापुढे सांगितले की, महाराष्ट्र विधानसभेतील ५३ पैकी ४२ आमदार आमच्या गटाकडे आहेत. विधान परिषदेतील ९ पैकी ६ आमदारही आमच्या बाजूने आहेत. याशिवाय लोकसभेतील ५ पैकी १ व राज्यसभेतील ४ पैकी १ खासदार आपल्या गटात असल्याचा दावाही अजित पवार गटाने आपल्या युक्तिवादात केला आहे.
राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला आहे. त्यामुळे आमदारांची संख्याच आता महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष कोणाचा? हे ठरवता येईल, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी आजच्या सुनावणीसाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा