
नवी दिल्ली- रशिया-युक्रेन युद्ध सुरुच असताना आता इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. इस्त्रायलवर गाझापट्टीमधून दहशतवादी संघटना हमासने शेकडो रॉकेट्स डागून मोठं नुकसान केल्याच्या घटनेनंतर इस्त्रायलनं युद्धाची घोषणा केली आहे. या हल्ल्यात असंख्य इस्त्रायली नागरिक मारले गेले आहेत. (Israel-Palestine War) हमासचे शेकडो दहशतवादी इस्त्रायलमध्ये घुसले असून रस्त्यावर लढाई सुरु झाली आहे. या घटनाक्रमानंतर इस्त्रायलनं आता मोठ्या हल्ल्याने प्रत्युत्तर देण्याची तयारी चालविली आहे. अमेरिकेने या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आम्ही इस्त्रायलसोबत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा संघर्ष झडणार असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया सुरु असल्याचे बोलले जात होते. आज इस्त्रायलमध्ये धार्मिक सुट्टी होती. भल्या सकाळीच मोठ्याने भोंगे वाजू लागले. अचानक इस्रायलवर गाझा पट्टीतून शेकडो रॉकेट डागण्यात आले. त्यामुळे इस्त्रायलयाच्या अनेक भागात मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. रॉकेट हल्ल्यासोबतच मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. इस्त्रायलच्या लष्करालाही लक्ष्य करण्यात आले आहे. इस्त्रायलचे लष्कर आता मोठी योजना आखत असल्याचे समजते. ‘गाझा स्ट्रिपमध्ये हमास दहशतवादी संस्था कार्यरत आहे. देशावर जे हल्ले झाले त्यासाठी ही संघटनाच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील. असा इशारा इस्त्रायलने दिला आहे.