हसन मुश्रीफांची हकालपट्टी करा-विजय वडेट्टीवार

0

मुंबई- एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यांच्यासह इतर ९ मंत्र्यांची देखील हकालपट्टी करावी लागणार असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. (Leader Of Opposition Vijay Wadettiwar)
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील मनी लँड्रींग प्रकरणात पीएमएलए न्यायालयाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध गंभीर निरीक्षण नोंदविले आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पीएमएलए न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांचा अटकपूर्व जामीनासाठीचा मार्ग आणखी कठीण होत असल्याचे दिसत आहे. या सर्वांनी मिळून घोटाळा केल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले असून याप्रकरणात कोणालाही अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारला शेतकऱ्यांसदर्भात चिंता असेल तर शेतकऱ्यांना फसवणाऱ्या हसन मुश्रीफ यांची तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, असे वडेट्टीवार म्हणाले. पुढच्या १०-१२ दिवसांत या मंत्रिमंडळातील नऊ भ्रष्टाचारी मंत्र्यांना त्यांना काढावेच लागेल, यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले. हे नऊ मंत्री कोण? याबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले की मी या नऊ मंत्र्यांची नावे सांगू शकत नाही. पण मंत्रिमंडळाच्या फेररचनेनंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात नसतील हे मी तुम्हला खात्रीपुर्वक सांगतो, असा दावाही त्यांनी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा