रानावनातील, जंगलांतील जमीन कसदार ठेवण्यात, झाडांचे कीटकांपासून संरक्षण करण्याबरोबरच नैसर्गिकरित्या कुजलेल्या प्राण्यांच्या विघटनाचे महत्त्वाचे काम करणाऱ्या मुंग्यांना वन्यजीवांच्या यादीत स्थान देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. याच वेळी पुण्यातील अभ्यासकांनीही सर्वसामान्यांना दुर्लक्षित मुंग्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी चळवळ सुरू केली आहे.
रानावनातील, जंगलांतील जमीन कसदार ठेवण्यात, झाडांचे कीटकांपासून संरक्षण करण्याबरोबरच नैसर्गिकरित्या कुजलेल्या प्राण्यांच्या विघटनाचे महत्त्वाचे काम करणाऱ्या मुंग्यांना वन्यजीवांच्या यादीत (Wildlife status for Ants) स्थान देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. याच वेळी पुण्यातील अभ्यासकांनीही सर्वसामान्यांना दुर्लक्षित मुंग्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी चळवळ सुरू केली आहे.
वन्यप्राणी संवर्धन (Wildlife conservation) म्हटले, की अनेकदा मोठ्या प्राण्यांबद्दल बोलले जाते; पण जंगलातील निसर्गसाखळी टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अनेक छोटे जीव दुर्लक्षित राहतात. त्यामुळेच मुंगी अभ्यासक नूतन कर्णिक आणि कीटक अभ्यासक डॉ. राहुल मराठे यांनी सध्या कीटकांबाबत जनजागृतीपर व्याख्यानमाला आणि ‘इन्सेक्ट वॉक’ सुरू केले आहेत. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने डॉ. कर्णिक यांनी ‘मटा’बरोबर वन्यजीव म्हणून निसर्गातील मुंग्यांच्या कामाची माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात जगभरात मुंग्यांची संख्या सुमारे २० क्वाड्रिलयन (२०च्या पुढे १९ शून्य) एवढी प्रचंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर साधारण प्रत्येक माणसामागे २५ लाख मुंग्या पृथ्वीवर राहतात. या आकड्यांसाठी अभ्यासकांनी ८० वर्षांतील संशोधनांचा संदर्भ घेतला आहे. जगात आतापर्यंत १५ हजारांहून अधिक जातीच्या मुंग्यांची नोंद झाली असून, नवनवीन प्रजाती पुढे आहेत. भारताचा, महाराष्ट्राचा विचार केल्यास जमिनीवर, जमिनीखाली आणि झाडांवर राहणाऱ्या तिन्ही प्रकारच्या मुंग्या आपल्याकडे वास्तव्यास आहेत, असे कर्णिक यांनी सांगितले.
जंगलातील परिसंस्था टिकवून ठेवण्यात मुंग्यांचा वाटा मोठा आहे. त्यांच्यावर आपल्याकडे चांगले संशोधनही झाले आहे. मात्र, भारतातच नाही, तर जगातही मुंग्यांना वन्यजीवांच्या यादीत स्थान मिळालेले नाही. जगभरातील वन्यप्राणी, वनस्पतींचे दस्तावेजीकरण आणि संवर्धनासाठी कार्यरत इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने अलीकडेच यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी आपल्याकडील पतियाळा येथील पंजाबी विद्यापीठाचे प्रसिद्ध मुंगी अभ्यासक डॉ. हिमेंदर भारती यांची ‘आययूसीएन’ने मुंगी संशोधन विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय मुंग्यांचे संशोधन, दस्तावेजीकरण आणि त्यांच्यासमोरील आव्हानांवर प्रामुख्याने काम करणार आहेत, असे सांगून भारतातही मुंग्यांना वन्यजीवांचा दर्जा मिळण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात २० वर्षांपूर्वी रानवा संस्थेने केलेल्या जैवविविधतेच्या सर्वेक्षणात तेजस्विनी पंचपोर यांनी शहरातील मुंग्यांचा अभ्यास केला होता. त्यानंतर असा समग्र अभ्यास झाला नाही. लोकसहभागातून मुंग्यांच्या दस्तावेजीकरणाचा आमचा विचार आहे, असे कर्णिक यांनी सांगितले.महाराष्ट्राचे वैशिष्ट्य ‘फोर्ट अँट’
इतर राज्यांत फारशा न आढळणाऱ्या मात्र महाराष्ट्रातील जंगलांत राहणाऱ्या ‘फोर्ट अँट’ किंवा ‘हार्वेस्टर अँट’ (Harvester Ants) ही मुंग्यांची वैशिष्ट्यपूर्ण जात. पुण्यालगतच्या वनक्षेत्रात, ताम्हिणी, भीमाशंकर अभयारण्य आणि जास्त पाऊस पडणाऱ्या भागात ‘फोर्ट अँट’च्या वसाहती दिसतात. या मुंग्या किल्ल्यांच्या बुरुजाप्रमाणे वसाहती बांधतात. बुरुजांखाली मोठे भुयार असते. त्यात मुंग्यांच्या खोल्या असतात. वेगवेगळ्या झाडांच्या बिया त्या भुयारात साठवतात. पावसाचे पाणी साठायला नको; म्हणून उतार बघून बुरुज बांधले जातात.
विणकरी मुंग्या उपयोगी
पुण्यातील अनेक बंगल्यांच्या आवारातील बागांमध्ये विणकरी मुंग्या सापडतात. अनेकांना त्या त्रासदायक वाटतात. प्रत्यक्षात त्या फळझाडांसाठी खूप उपयोगी आहेत. त्या आक्रमक असल्याने त्यांची वसाहत असलेल्या झाडांवर इतर कीटकांना येऊ देत नाहीत. त्यामुळे फळझाडांना नैसर्गिकरित्या संरक्षण मिळते. आफ्रिकेतील अनेक शेतकरी विणकरी मुंग्यांच्या कॉलनी त्यांच्या फळझाडांच्या बागांमध्ये घेऊन जातात. यामुळे फळांचे उत्पादन वाढत असल्याचा त्यांचा विश्वास आहे.
मुंग्या काय करतात?
- जमिनीखाली घरे बांधत असल्याने मातीतील हवा खेळती राहते.
- मुंग्यांच्या विष्ठेतून नायट्रोजन मिळाल्याने जमिनीचा कस सुधारतो.
- कुजलेले प्राणी खाऊन मुंग्या कचरा साफ करतात.
- काही मुंग्या झाडांसाठी ‘पेस्ट्र कंट्रोल’चे काम करतात.
- मुंग्या या अनेक पक्ष्यांचे, अस्वल, खवले मांजराचे खाद्य असतात.