
गडचिरोली : २० दिवसांत सासु-सासरे व पतीसह पाच जणांवर विषप्रयोग करुन त्यांना ठार मारणाऱ्या संघमित्रा कुंभारे या महिलेला वडीलांच्या आत्महत्येचा सूड घेण्यासाठी केवळ सासू आणि सासरे अशा दोघांना ठार करायचे होते. मात्र, या प्रकरणात सहभागी असलेली तिची मामेसासूने रोजा रामटेके हिने जबरदस्ती केल्याने तिला मनात नसताही पतीचा जीव घ्यावा लागल्याचे पोलिसांच्या चौकशीतून पुढे आले आहे. रोजा रामटेके हिला ४ एकरचा भूखंड हडपण्यासाठी कुटुंबातील १६ जणांचा जीव घ्यायचा होता, अशीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील महागाव येथे हे हत्याकांड उघड झाले आहे. (Gadchiroli Murder Case )
या प्रकरणात आरोपी संघमित्रा आणि रोजा या दोघी सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणात रोजाचा पती प्रमोद हा सहभागी आहे की कसे, याचीही पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी सांगितले की, रोजाचा पती प्रमोदच्या चार बहिणी, त्यांचे पती आणि मुलांनी चार एकर जमिनीत समसमान वाटा मागितल्याने त्यांच्यात वैर निर्माण झाले होते. त्यामुळे तिने संघमित्रा या भाचेसुनेशी हातमिळवणी केली. संघमित्राने थॅलियम वापरुन स्लो पॉयझनिंगद्वारे एकेकाला संपवण्याची योजना आखली. त्यापैकी संघमित्राचा पती रोशन, सासरे शंकर, सासू विजया, सासूची बहीण (मावस सासू) वर्षा उराडे आणि रोशनची बहीण (नणंद) कोमल दहेगावकर या पाच जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. आणखी तिघे जण विषबाधेमुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. कृषी वैज्ञानिक असलेल्या संघमित्राने विष प्रयोग करण्यासाठी विषाचा शोध घेण्यात बराच वेळ घालविल्याचे तिच्या फोनमधील सर्च हिस्ट्रीमधून स्पष्ट होते. ऑगस्टपासून तिने याविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. बऱ्याच शोधानंतर तिने गंधहीन, रंगहीन आणि अत्यंत विषारी असलेल्या थॅलियमची विषप्रयोगासाठी निवड केली, असे पोलिसांनी सांगितले.

पतीला मारायचे नव्हते
संघमित्राने पतीला का ठार केले, याबाबत पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यावेळी पती रोशन याला ठार मारायचे नव्हते, असे तिने सांगितले. ती पती रोशनशी भावनिकरित्या जुळलेली होती. ऑगस्टमध्ये त्याने तिला मारहाण केल्यावर तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, रोशनला विष पाजण्यावरून संघमित्रा द्विधा मनस्थितीत होती. परंतु एप्रिलमध्ये संघमित्राच्या वडिलांनी केलेल्या आत्महत्येची आठवण करुन घेत रोजाने तिला बळजबरी केली.