फुटीरतावादी घटकांपासून दूर राहा : डॉ. मोहन भागवत

0

नागपूर NAGPUR  : “आगामी निवडणुकांमध्ये भावना भडकावून मते मिळविण्याचे प्रयत्न होतील व ते होतच राहतात. समाजात फूट पाडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे पालन प्रत्येकानं केलं पाहिजे. मतदान विचारपूर्वक व मन शांत ठेवून केले पाहिजे. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे”, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी नागपुरात संघाच्या विजयादशमी उत्सवात केले. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पद्मश्री शंकर महादेवन हे यंदाचे प्रमुख पाहुणे होते. आपल्या भाषणात सरसंघचालक डॉ. भागवत यांनी मणिपूर हिंसाचार, राष्ट्रीय एकात्मता, अयोध्येतील राम मंदिर, जी-२०च्या आयोजनाचं यश, देशाची प्रगती, खेळाडूंची कामगिरी अशा विविध विषयांवर भाष्य केलं. (RSS VijayaDashmi Utsav-2023)

डॉ. भागवत म्हणाले, कोणीही कितीही चिथावणी दिली तरी प्रत्येक परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करत, नागरी शिस्त पाळून, आपल्या घटनेने दिलेल्या संकेतांनुसार आचरण अनिवार्यपणे करायला हवे. स्वतंत्र देशात ही अशी वागणूकच देशभक्तीची अभिव्यक्ती मानली जाते. प्रसारमाध्यमांतून होणारा चिथावणी देणारा भडकाऊ अपप्रचार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या स्पर्धेत आपण अडकू नये. सुसंघटीत सामर्थ्यसंपन्न समाजाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार आणि सरकार, प्रशासनाला केलेले योग्य सहकार्य हाच हिंसाचार आणि गुंडगिरीवर मात करण्याचा योग्य उपाय आहे, असेही मोहन भागवत म्हणाले.

राजकीय स्वार्थासाठी अनिष्ट शक्तिंशी युती करण्याचा अविवेक केला जातोय. अशा राक्षसी शक्तिंना बाह्य शक्तिंचाही सहज पाठिंबा मिळू शकतो, असा सावधगिरीचा इशाराही भागवत यांनी इंडिया आघाडीचे नाव न घेता दिला.

राम मंदिर

अयोध्येतील राम मंदिर निर्माण कार्याचा उल्लेख करुन सरसंघाचालक डॉ. भागवत म्हणाले की, आपले राष्ट्रीय आदर्श प्रभू श्रीराम यांचे मंदिर तयार होत आहे. २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. आपण सारेच तेथे जाऊ शकणार नाही. पण, आजुबाजुच्या मंदिरांमध्ये नक्कीच जाऊ शकतो. देशात धार्मिकतेचे वातावरण निर्णाण करण्यासाठी आपण प्रयत्न करु शकतो, असे ते म्हणाले.

मणिपूर अस्वस्थ का आहे?

सरसंघचालक डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात मणिपूरमधील संघर्षाचा उल्लेख केला. भागवत म्हणाले, मणिपूर सध्या शांत होत आहे. पण आपापसांत हा वाद कसा झाला? गेल्या अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकी सोबत राहात होते. अचानक वाद कसा झाला? ते भारताच्या सीमेवरील राज्य आहे. तेथे असे वाद होण्यात कोणाचा फायदा आहे? बाहेरच्या शक्तींचाही फायदा आहे. पण हे सगळं करणारे बाहेरचेच लोक होते का सारे?, असा प्रश्नही डॉ. भागवत यांनी उपस्थित केला. केंद्र सरकार मजबूत आहे आणि तत्परही आहे. खुद्द गृहमंत्री तेथे तीन दिवस जाऊन राहिले. सर्व प्रयत्न केले. देशाचं सरकार तिथे शांततेसाठी कटीबद्ध आहे. पण तरीही वाद सुरुच राहिले कारण शांततेचे प्रयत्न सुरु असतानाच कुठलातरी वाद निर्माण केला जात होता. ही हिंसा भडकवणारे लोक कोण होते? हे होत नाहीये, हे केले जात आहे. त्यावर खूप सारे काम करावे लागेल, असेही ते म्हणाले. तेथे लोकांची मनं दुखावली आहेत. फक्त शांती नाही, आता समाजाला जोडण्याचेही काम करावे लागेल. संघाचे स्वयंसेवक आधीही तेच करत होते, आजही तेच करत आहेत. मणिपूरमध्ये स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान आहे. पण, तेथे सगळ्यांना काम करावे लागेल. सरकारची इच्छाशक्ती तर आहेच. पण त्याचबरोबर प्रशासनाच्या कृतीशीलतेचीही गरज आहे. अविश्वास कमी करण्यासाठी तेथील नेतृत्वालाही काम करावे लागेल, असा सल्लाही डॉ. भागवत यांनी यावेळी दिला. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे शास्त्रीय गायक शंकर महादेवन यांच्यासह संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया

सरसंघचालकांच्या भाषणातील इतर मुद्दे-

-भारतीयांचा गौरव जगभरात वाढतो आहे. यावर्षी विजयादशमीला देखील आपण याची अनुभूती घेत आहोत. जी-२० परिषदेत भारताच्या आतिथ्याचं जगभरात कौतूक झालं. विविधतेने नटलेल्या देशाच्या संस्कृतीचा त्यात गौरव करण्यात आला. आपल्या मनातील प्रामाणिक सद्भावना आणि राजनैतिक कुशलता देखील सर्वांनी पाहिली.
-आर्थिक विषयांवर केंद्रित परिषदेत पहिल्यांदा वसुधैव कुटुंबकम्, महिलांच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करण्यात आली आणि ती मानव केंद्रित चर्चा झाली.
-आपल्या खेळाडूंनी देखील आशियाई खेळांमध्ये १०० पेक्षा अधिक पदकं मिळविली. आपला देश सर्व क्षेत्रांमध्ये विकास करतोय. आपली अर्थव्यवस्था देखील पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
–डिजिटल तंत्रज्ञानांचा उपयोग आपण गरीबांच्या उत्थानासाठी केला. ही प्रगती आपण पाहिली आहे. स्टार्टअपची क्रांती झाल्याचे बघायला मिळाले. कृषी, अंतराळ, संरक्षण या सर्व क्षेत्रात आपण प्रगती पाहिली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा