पक्षाने नाही लोकांनी मला आधार दिला-पंकजा मुंडे

0

बीड   BEED : “मला त्रास देणाऱ्या विरोधकांचे घर उन्हात बांधल्याशिवाय राहणार नाही. भगवान बाबांना देखील वेगळा गड निर्माण करावा लागला होता. तशीच परिस्थिती आपल्यापुढेही असून गेले काही दिवस वेगळा पर्याय शोधत आहे”, असे वक्तव्य भाजपच्या  BJP नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून लढणार नसल्याचे स्पष्ट करताना आपण दुसऱ्याच्या कष्टाचं खाणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

विजयादशमीदिनी भगवान भक्तिगड येथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा यांनी हजारो समर्थकांसमोर पुन्हा एकदा मनातील खदखद व्यक्त करतानाच पक्ष नेतृत्वावर जाहीर नाराजी बोलून दाखविली. पंकजा मुंडे म्हणाल्या, “अनेक जण मला माझ्या मतदारसंघातून लढा, असा सल्ला देतात. प्रीतमताईंच्या बीड लोकसभा मतदारसंघातून लढा असेही काही जण म्हणत आहेत; पण तसले काही चालणार नाही. एखाद्याच्या कष्टाचे मी खाणार नाही. विधानसभा निवडणुकीत पडल्यांनतर मला कुबड्यांच्या आधाराची गरज होती. मात्र, हा आधार पक्षाने नव्हे, तर लोकांनी दिला. आता आम्ही संयम दाखवणार नाही. आता विरोधकांना पाडणार, असा इशारा त्यांनी दिला. ‘जे चारित्र्यहीन आहेत, पैशांच्या बळावर राजकारण करतात, त्यांना पंकजा पाडणार आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

पंकजा म्हणाल्या, देशात सारेच आलबेल आहे म्हणून तुम्ही मेळाव्याला आला आहात का? शेतकरी सुखी आहेत का? शेतकऱ्यांना विमा मिळाला का? अनुदान मिळाले का? शेतमजुराच्या हाताला काम आहे का? महाराष्ट्रात खूप सारे गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत असताना, सरकारकडून खूप अपेक्षा आहेत, आता अपेक्षाभंग सहन करू शकत नाही. आपल्याच सरकारने गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक बांधण्याची घोषणा करून दहा वर्षे झाली, तरी स्मारक पूर्ण झाले नाही. आता स्मारक उभारू नकाच. स्मारक उभारण्यापेक्षा शेतकऱ्यांना ऊसतोडणीतून मुक्त करून शिक्षण आणि पोषण द्या. धर्माच्या वाढलेल्या भिंती पाडा, तेच गोपीनाथ मुंडेंचे खरे स्मारक ठरेल. मी २०२४मध्ये मैदानात आहे आणि मला कोणीही रोखू शकणार नाही. आगामी काळात मी सिंदखेड राजा येथे जाऊन राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन नगर, जळगाव, नाशिक, सिन्नर, बुलढाणा येथे जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा