
ऑनलाइन गेमिंग फसवणुकीचे प्रकरण
गोंदिया २७ ऑक्टोंबर : ऑनलाईन गेमिंग फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सोंटू जैन याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास नागपूर पोलिसांनी सोंटू जैनच्या गोरेलाल चौकातील कुर्तावाला या दुकानाची झळती घेतली. रात्री उशीरापर्यंत नागपूर पोलिस सोंटूच्या दुकानात चौकशी करीत होते.

सोंटू जैन याच्या मोबाइलमधील डेटा मिळाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. याच डेटाच्या आधारावर पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी गोंदिया येथील डॉ. गौरव बग्गा व अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल यांच्यावर कारवाई केली. नागपूर आर्थिक शाखेचे पोलिस सध्या सोंटूची कसून चौकशी करीत आहे. यात अनेक नवीन माहिती पुढे येत आहे. दरम्यान गुरुवारी सांयकाळी नागपूर येथील आर्थिक शाखेचे ८ ते १० अधिकाऱ्यांचे पथक गोंदिया येथे दाखल झाले. यानंतर पथकाने स्थानिक गोरेलाल चौकातील सोंटू जैन याच्या मालकीच्या कुर्तावाला या दुकानात धडक दिली. दरम्यान या पथकाने या कारवाईबाबत अद्यापही कसलीही माहिती दिली नसून रात्री उशीरापर्यंत सोंटूच्या दुकानात नागपूर पोलिस झाडझडती घेत चौकशी करीत होते. तर यावेळी पोलिसांनी सोंटू जैनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच गोंदियात आणले होते.