
नागपूर : पीडीकेव्ही ग्राउंड, दाभा, नागपूर येथे २४ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या १४व्या अॅग्रोव्हिजन
राष्ट्रीय कृषी प्रदर्शन कार्यशाळा व परिसंवादाचे भुमिपूजन रविवार दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या या प्रदर्शनाचे स्टॉल व कार्यशाळेचे हॉल उभारणीच्या कामाला आज सकाळी स्थानीक पीडीकेव्ही, दाभा मैदानावर भुमीपूजन करून सुरवात करण्यात आली. या प्रदर्शनासाठी सुमारे ११००० चौ. मि. चे हँगर, ४००० चौ. मि. आकाराचे खुल्या मैदानातील स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत, कार्यशाळांसाठी ४ हॉल्स, स्वतंत्र पशुधन दालन व इनोव्हेशन दालन असा एरिया या प्रदर्शनाने व्यापला असेल.
गेल्या अॅग्रोव्हिजनच्या सर्व सत्रांना शेतकरी बांधव व शेतीसंबंधी सर्वांकडून भरगच्च प्रतिसाद मिळाला. यावर्षीही १४ व्या अॅग्रोव्हिजनला असाच प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असुन यावेळी आजपर्यंत ३०० पेक्षा अधिक कंपन्यांनी यात आपला सहभाग निश्चित केल्याचे श्री. रवि बोरटकर यांनी सांगीतले. भारतातील शेतीविषयक उत्पादने तयार करणाऱ्या अनेक मोठया कंपन्या, संशोधन संस्था, शासकीय विभाग, विविध राज्ये व कृषी विद्यापीठे प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान सादर करणार आहेत. सोबतच देशात कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन व सेवा विषयक संस्था, या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. याशिवाय एमएसएमइ व एनएसआयसी अंतर्गत उद्योगांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युपीएल, इव्हेन्ट स्पॉन्सर असून, अंकूर सिड्स, रासी सिड्स, महासीडस्, व्हिएनआर सिडस्, दफ्तरी सिडस्, माहिको सिड्स, लोकमंगल सीडस्, नझुविडू सिडस् या सारख्या बियाणे उत्पादन कंपन्या, टॅफे, कुबोटा, दशमेश, व्हीएच ग्रुप, आयटीसी, महिंद्र ट्रॅक्टर्स, फोर्स मोटर्स, एएसअॅग्री, धानुका, आयसीएआर, सीएसआयआर, एनएफडीबी, आरसीएफ, ईव्हर्सएआय, ॲनस, एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, सीडबी, कॅनरा बँक या सारख्या बँका या कंपन्यांनी आपला सहभाग निश्चित केला आहे.
