मा.भुजबळ साहेब असा रडीचा डाव खेळू नका…

0

 

१) उपोषणार्थी (Manoj Jarange Patil)मनोज जरांगे पाटील यांची (Chief Minister Eknathji Shinde)मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विनंतीवरून दोन निवृत्त न्यायाधीशांनी भेट घेतली व त्यांना मागण्यांबाबतच्या कायदेशीर मर्यादा आणि आरक्षणाची प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.या दोन्ही मान्यवरांनी मनाचा मोठेपणा दाखवल्याने भुजबळ साहेब ज्या सरकारमध्ये आपण मंत्रीपद उपभोगत आहात त्या सरकारलाच आंदोलन शमविण्यासाठी मदत झाली आणि तुम्ही त्यांच्यावरच टीका करता? हे तर घरभेद्यासारखं झालं! जरंगे यांचे उपोषण सुटू नये व महाराष्ट्रात उद्रेक आणि अशांतता आणखी वाढावी असा आपला हेतू होता काय?असा हेतू असेल तर मग हे तर सरकारच्या विरोधात आणि जाणीवपूर्वक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापुढे अडचणी वाढवण्याचाच कुटील डाव होत नाही का?

२)भुजबळ साहेब आपण म्हणता ओबीसी नेत्यांचीच घरे,कार्यालये, मालमत्ता टार्गेट करून जाळली.याचा अर्थ बीडचे खांडे,प्रकाश सोळंके,म्हस्के,पंडित हे सर्व ओबीसीच आहेत हे आपण मान्य केले आहे काय?आणि हे सर्व मराठा असतील तर मग आपण असे वक्तव्य करून मराठा ओबीसी वाद पेटवण्याचे कारस्थान चालवले आहे काय?

३)जरंगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील ऐतिहासिक महासभेत कोट्यावधींची गर्दी झाल्याने आसपासच्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यांना सरकारने भरपाई दिली. यावरही तुम्ही आक्षेप घेता,मराठाद्वेषापायी आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांबाबतची संवेदनशीलताही गमावली आहे का?याच शेतकऱ्यांमध्ये कदाचित आपल्या जातीचे,तुम्ही स्वयंघोषित ठेकेदार असलेल्या ओबीसीं मधलेही काही शेतकरी असतील हेही विसरलात काय?

४)आणि भुजबळ साहेब तुमचा सर्वात मोठा रडीचा डाव म्हणजे ज्या जुन्या कागदपत्रांमध्ये मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळतात त्यावरही तुमचा आक्षेप आहे.त्यांनाही तुम्ही कुणबीचे प्रमाणपत्रं घेण्यास विरोध करीत आहात किंबहुना याबाबत तुमचा प्रचंड जळफळाट सुरू आहे.मराठ्यांचे कुणबीचे पुरावे शोधले जाऊच नयेत असे तुम्हाला वाटणे म्हणजे तुम्ही सरळ सरळ मराठ्यांचा कायदेशीर अधिकारही नाकारत आहात,तेही राज्याच्या संविधानिक मंत्रीपदावर विराजमान होऊन! मंत्री होताना घेतलेली राष्ट्रनिष्ठेची शपथ विसरलात तुम्ही?कमालच म्हणायला पाहिजे तुमची!
खरंतर सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मिळणे किंवा ओबीसीचे आरक्षण मिळणे हा आमचा मराठ्यांचा घटनादत्त अधिकार आहे.मात्र आज काही कायदेशीर अडथळ्यांमुळे (कदाचित ते तुमच्यासारख्यांनीच उभे केले असतील)आम्ही आमच्या या अधिकारांपासून दूर आहोत.आमच्या जाणत्या नेत्यांनी तुमच्यासारखं मराठा जातीसाठी कधीही काम केलं नाही,त्याची फळं आम्ही सर्वसामान्य मराठा भोगतो आहोत.तुम्ही आरक्षणाची खिरापत लुटत होता तेव्हा आम्ही हक्क सांगितला नाही म्हणून आज कायदेशीर अडथळ्यांना, अडचणींना तोंड देत आहोत हे आमचं दुर्दैव आहे.

५) मनोज जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखालील आंदोलन शांत झाल्यावर तुम्ही मराठा-ओबीसी वाद लावण्यासाठीची मोहीम उघडल्याचे स्पष्ट जाणवतेय.यामागे तुमचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीची ही केविलवाणी धडपड लपून राहिलेली नाही.मराठ्यांची मतं तर आता पडणार नाहीत,निदान ओबीसींची तरी खरडून गोळा करू म्हणजे वाचलो तर वाचलो हा तुमचा आटापिटा यातून दिसतो आहे.या राज्याचे एक जबाबदार मंत्री म्हणून अशा पद्धतीने दोन समाजात भांडणं लावणे योग्य आहे का?
भुजबळ साहेब तुमचं हे सर्व लबाडीचं वागणं क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीरावांच्या समतेच्या मंत्राला मूठमाती देणारं आहे हे विसरू नका. ही बेईमानी मराठ्यांशीस नव्हे तर ज्योतिरावांच्या विचारांशी सुद्धा आहे.

जय ज्योती! जय शिवराय!

— संजीव भोर पाटील,
संस्थापक अध्यक्ष शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा