
मुंबई mumbai : राज्यातील ओबीसी obc विरुद्ध मराठा maratha संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी राज्य मंत्रिमंडळात दोन मंत्र्यांमध्ये जोरदार वाद होऊन मंत्री एकमेकांवर धावून गेल्याचा दावा केला आहे. मात्र, ही चुकीची माहिती असून फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांनी सामंजस्याने बोलावे, अशा सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे स्पष्टकरण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
मंत्री एकमेकांवर धावून वगैरे गेल्याचे जर संजय राऊतांनी सिद्ध करून दाखवले तर आम्ही मंत्रीपदाचे राजीनामे देऊ, असे आव्हानही मुश्रीफ यांनी दिले आहे. (MP Sanjay Raut)
खासदार राऊत यांनी आज दावा केला की, मराठा-ओबीसी मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत भांडणं होत आहेत. कॅबिनेट बैठकीत एक-दोन मंत्री मार खातील, असे आपल्याला वाटत आहे. मंत्री एकमेकांना मारतील इतके वातावरण बिघडले असल्याचा दावाही त्यांनी केला.

आम्हाला आतून ज्या बातम्या मिळत आहेत, त्यावरून सांगतो की काही मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण नाही. छगन भुजबळ, साताऱ्याचे शंभूराज देसाई असे खूप जण आहेत. मी इतरही नावे घेऊ शकतो. राज्यावर अशी परिस्थिती यापूर्वी कधीच आली नव्हती, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, त्यावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी राऊत यांची माहिती चुकीची असून ती त्यांनी सिद्ध करुन दाखविल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देऊ, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.