
मुंबई MUMBAI मराठा समाजातील तरुणांनी मनोज जरांगे यांचे ऐकून निर्णय घेतले तर भविष्यात त्यांचे खूप मोठे नुकसान होईल, असा इशारा विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी दिलाय. त्यामुळे मराठा तरुणांनी अभ्यास करुन आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुंबई माध्यमांशी बोलतानिा विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा समाजाला ३७२ जाती असलेल्या ओबीसी प्रवर्गात येऊन फार काही फायदा मिळणार नाही. मराठा समाज ओबीसीत आला की ओपन (खुल्या) प्रवर्गात फार जाती राहणार नाहीत. नोकऱ्यांचा आणि सोयीसवलतींचा विषय येतो, त्या पातळीवर मराठा समाजाचे फार मोठे नुकसान होईल. अशा परिस्थितीत मराठा तरुणांनी अभ्यास करुन, थोडा विचार करुन, आपण कोणाला साथ देतोय, आपले भले कशात आहे, याचा विचार करावा, असे वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले, मराठा आंदोलकांवर जो लाठीमार झाला त्यानंतर मनोज जरांगे पाटील हिरो म्हणून पुढे आले. त्यानंतर ‘हम झुका सकते है’ अशी भावना मनोज जरांगे यांच्या मनात निर्माण झाली. मराठा समाजाने दिलेल्या पाठबळामुळे त्यांच्या मनात गर्व निर्माण झाला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला धमकावत राहिले. या धमक्यांनी प्रश्न सुटणार आहेत का? कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसून कराव्या लागतात व कायद्याला धरुन कराव्या लागतात. कोणालाही कुठेही घुसवता येत नाही. आता सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देऊन टाका. मग गुजराती कुणबी, मारवाडी कुणबी, लिंगायत कुणबी, असंच होऊन जाऊ दे, अशी खोचक टिप्पणीही वडेट्टीवार यांनी केली.