
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज निकाल देऊन त्यांना दिलासा दिला. २०१० मध्ये कल्याण पोलिसांनी बजावलेल्या तडीपारच्या नोटीशीचे हे प्रकरण असून या प्रकरणात राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्यावरील गुन्हे आणि त्या अनुषंगाने न्यायालयात सुरू असलेली कारवाई रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. (MNS Chief Raj Thackeray)
या याचिकेवर यापूर्वी सुनावणी पार पडली होती. १५ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. तो आज जाहीर करण्यात आला. हे प्रकरण असे की, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या २०१० च्या निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांना कल्याण डोंबिवली मनपाच्या हद्दीत तडीपारीची नोटीस बजावली होती. ती नोटीस राज ठाकरे यांनी स्वीकारली नव्हती. त्यानंतर त्यांच्या कार्यालयावर ही नोटीस लावण्यात आली. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत राज ठाकरे कल्याणमध्ये आले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.