भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचे निधन

0

मुंबई, 10 नोव्हेंबर   भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचे मुंबईत निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांनी सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि पुढे भाजपामध्ये कार्य केले आहे. ते मार्गारेट अल्वा नंतर कर्नाटकमधून राज्यपाल झालेले दुसऱ्या क्रमांकाचे व्यक्ती असून जीएसबी (गौड सारस्वत ब्राह्मण) कम्युनिटीचे पहिले राज्यपाल होते.

पद्मनाभ आचार्य यांचा ८ ऑक्टोबर १९३१ मध्ये कर्नाटक किनारपट्टीवरील उडुपी येथे त्यांचा जन्म झाला होता. आचार्य यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान आसाम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम केले. दरम्यान आज, शुक्रवारी त्यांच्या जुहू येथील राहत्या घरी निधन झाले.

राजकीय-सामाजिक कारकीर्द

पद्मनाभ आचार्य हे लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. १९४८ मध्ये संघावरील बंदीच्या काळात त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. तुरुंगवासानंतरही शिक्षण सुरू ठेवत आचार्य यांनी उडुपीच्या एमजीएम कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कायद्याचे पुढील शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईत आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या आचार्य यांनी अभाविपमध्ये त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ईशान्य भारताशी संबंधित समस्यांचे निराकरण केले. याशिवाय, १९९५ ते २००१ दरम्यान आचार्य यांनी भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणूनही काम केले. मुंबईत अनेक शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या उपनगर शिक्षण मंडळाचे त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व केले.

२००२ मध्ये, पद्मनाभ बालकृष्ण आचार्य हे केरळ आणि लक्षद्वीप आणि २००५ मध्ये तामिळनाडूच्या प्रभारासह राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य होते. आचार्य हे एससी/एसटी मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी आणि ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपा’ आणि ईशान्य भारत संपर्क सेलच्या राष्ट्रीय प्रभारीचे सह-संयोजक होते. आचार्य ईशान्येकडील आदिवासी मुलांसाठी ‘माय होम इज इंडिया’मध्ये सक्रियपणे कार्यरत होते. ज्यांना मुंबई शहरातील कुटुंबांनी शैक्षणिक हेतूने आमंत्रित केले होते. त्यांच्या निवासस्थानी अनेक विद्यार्थी अनेक वर्षे (१९६९-७९) राहत होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा