
नवी दिल्ली- ब्रॉडकास्टिंग सेवा आणि ओटीटीवरील कंटेंटच्या नियमनासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार आहे. यासंदर्भात माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली. सध्या ओटीटीवरील कंटेंटवर कुठलेही नियंत्रण नाही. त्यामुळे त्यावर नियंत्रणाची जोरदार मागणी होत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर केंद्र सरकारकडून विधेयक आणले जाणार असून ते मंजूर झाल्यास नेटफ्लिक्स, अमेझॉन आणि डिस्ने-हॉटस्टारवर सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटचे देखील नियमन होणार आहे.
प्रसारण सेवा नियमन विधेयकाचा मसुदा समोर आणताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. या नव्या कायद्यामुळे ब्रॉडकास्टिंग सेक्टरच्या नियमनासाठी फ्रेमवर्क तयार केले आहे. जुने कायदे आणि नियम जाऊन एकच असा भविष्याच्या विचार करुन तयार करण्यात आलेला कायदा अस्तित्वात येईल, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. नव्या कायद्यानुसार ‘मजकूर मूल्यमापन समिती’ स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचा समावेश असणार असेल. जाहिरात कोड आणि प्रोग्रॅम कोड यांमधील उल्लंघनासंबंधी सरकारला सल्ला देण्यासाठी नवीन ब्रॉडकास्टिंग सल्लागार परिषदेची स्थापना केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.