
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना भूरळ पाडणारी माया वाघीण सुमारे दीड महिन्यांपासून बेपत्ता आहे. ट्रॅप कॅमेरे लावून तिचा शोध घेतला जात आहे. पण, ती नेमकी कुठे आहे याबाबत काहीही माहिती अजून मिळालेली नाही. तिने बछड्यांना जन्म दिला असावा, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाहेर निघत नसावी, वय झाले असल्याने नैसर्गिक मृत्यू झाला असावा असे अंदाज वर्तविले जात आहेत.
मागील दोन महिन्यांपासून माया दिसत नसल्याने तिच्यासोबत काही बरेवाईट तर झाले नाही ना अशी शंका वन्यजीवप्रमींच्या मनात निर्माण झाली आहे. चिमूर तालुक्यातील वन्यजीवप्रेमी यांनी कवडू लोहकरे यांच्या नेतृत्वात माया वाघीणीचा शोध घेण्यासाठी” सर्च माया” आंदोलन सुरू करण्यात आले आहे. डॉ. सुशांत इंदोरकर, मंगेश वांढरे, राहुल गहूकर, भुनेश वांढरे, हेमंत दडमल, रणजित श्रीरामे, राकेश धारणे, सुदर्शन बावणे, समिक्षा इंदोरकर यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आहे

कोण आहे माया
‘माया वाघीण’ ही अत्यंत रुबाबदार अशी वाघीण आहे. तिची अदा आणि तिची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक वारंवार ताडोबाची वारी करतात. एकदा शिकार मिळण्यासाठी वाघाला अनेकदा प्रयत्न करावे लागतात. मात्र माया वाघीणीला अपवादात्मक असे कौशल्य प्राप्त आहे. शिकार करण्याची अपवादात्मक कला, अत्यंत चाणाक्ष आणि आक्रमक स्वभाव यामुळेच तिला ताडोबावर राज्य करणारी ताडोबाची राणी संबोधले जाते. माया ही यापूर्वी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या ‘माधुरी’ या वाघीणीची मुलगी आहे. 2010 मध्ये तिचा जन्म झाला. शिकार करण्याचे बाळकडू मायाला आई माधुरी कडूनच मिळाले. माया ही केवळ ताडोबाची राणी म्हणूनच नव्हे तर, एक चांगली आई म्हणून देखील ओळखली जाते. आपल्या बचड्यांचा अत्यंत काळजीने ती सांभाळ करते. आपल्या बचड्यांशी खेळताना, त्यांच्यावर लक्ष ठेवताना, त्यांना आवाज देताना असे अनेक व्हीडिओ माया वाघीणीचे व्हायरल झाले आहेत. म्हणून समाजमाध्यमात मायाची क्रेझ आहे. ‘छोटी तारा’ या प्रसिद्ध वाघीणीसोबत मायाची अनेकदा झुंज झाली आहे. मात्र नेहमी मायाने तिला पिटाळून लावले आहे