
बीड BEED : बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचे MARATHA ARAKSHAN आंदोलन हिंसक होऊन अनेक राजकीय नेत्यांची घरे पेटविण्यात आली किंवा त्यांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनांमध्ये आता पोलिसांनी दंगलखोरांविरुद्ध कारवाई सुरु केली असून व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून अटकसत्र सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत १८१ जणांवर पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी काही पोलिस कोठडीत तर काही कारागृहात असल्याची माहिती आहे. (Maratha Reservation Agitation)
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत उपोषण सुरु असतानाच ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी बीडमधील आंदोलन हिंसक होऊन त्यात नेत्यांच्या घरांचे जाळून किंवा तोडफोड करून नुकासन करण्यात आले. राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, बीआरएसचे दिलीप गोरे यांची कार्यालये पेटवून देण्यात आली. माजलगाव येथील नगरपालिकेसह आमदार प्रकाश सोळुंके, आमदार संदीप क्षीरसागर यांचे राहत्या घरांनाही आग लावण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांवर भादंविच्या ३०७ अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक करण्याची मोहीम राबवली आहे. ज्यात आतापर्यंत 181 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिसांनी घटनेचे व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. ज्यात आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक लोकांची ओळख पटविण्यात आल्याची माहिती आहे. दिवाळीत पोलिसांची धरपकड सुरु असल्याने अनेकांनी शहर सोडल्याचीही माहिती आहे. मात्र, या सर्व आरोपींना इतर जिल्ह्यांतून शोधून ताब्यात घेण्यात येत आहे. जाळपोळ करणारे कोणत्या समाजाचे आहे हे आमच्यासाठी महत्वाचे नसून, आमच्यासाठी आरोपी हा आरोपीच आहे हे महत्वाचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात येत आहे.