
गोंदिया – गोंदिया जिल्ह्याची धानाचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग विभाग यांच्याद्वारे अद्यापही अधिकृतरित्या केंद्र सुरू न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे शेतकऱ्यांना आपले धान्य खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकण्याची वेळ आज शेतकऱ्यांवर आली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत जवळील मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये धानाला चांगला भाव आहे. परंतु महाराष्ट्रात कमी भाव आहे असे असूनही शेतकऱ्यांचे शासकीय दराने धान विकण्यासाठी तयार असताना सुद्धा धान केंद्र सुरू झाले नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आता शासनाने लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी आता मागणी करीत आहेत.