
इम्फाल, 14 नोव्हेंबर : हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील इंटरनेट बंदीला पुन्हा एकदा वाढवण्यात आलेय. यापूर्वी 13 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते. त्याला आता 5 दिवसांची मुदतवाढ देत 18 तारखेपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. राज्यात 3 मे पासून इंटरनेट बंद असून दर 5 दिवसांनी बंदीला मुदतवाढ दिली जातेय.
याबाबत मणिपूरच्या गृह विभागाचे आयुक्त म्हणाले की, राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांनी जनभावना भडकावणारे चित्र, द्वेषपूर्ण भाषणे आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ शेअर करू नयेत. याशिवाय अफवा पसरवू नयेत. यासाठी इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यात 3 मेपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 187 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे 1 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. राज्यातील बिष्णुपूर, चुरचंदपूर, इम्फाळ पूर्वेसह 5 जिल्ह्यांमध्ये दोन समुदायांमध्ये गोळीबार झाल्याच्या बातम्या आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत काही समाजकंटकांकडून जनभावना भडकावण्याचा प्रयत्न होण्याची भीती आहे. काही लोक द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ शेअर करून हिंसा पसरवू शकतात. त्यामुळे इंटरनेटवरील बंदी आणखी 5 दिवस वाढवण्यात आली आहे.
