
रत्नागिरी RATANAGIRI -कोकणात गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर अडकलेल्या whale व्हेल माशाला पुन्हा एकदा समुद्रात सोडण्यात अखेर यश आले आहे. व्हेल माशाच्या या पिल्लाला समुद्रात सोडण्यासाठी ४० तास लागले. सरकारी यंत्रणेसह स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच पर्यटक त्यासाठी कामाला लागले होते. अखेर त्याला यश येऊन माशाला जीवदान मिळाले.
सोमवारी समुद्राला ओहोटी असल्याने व्हेल मासा गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर अडकल्याचे पर्यटकांच्या लक्षात आले. तेथील बोट क्लबच्या सदस्यांनाही हा व्हेल मासा दिसला. त्यामुळे त्यांनी तातडीने पावले उचलत त्याला समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महाकाय व्हेल माशाचं हे पिल्लू वाळूत रुतून बसले होते. त्यामुळे त्याला समुद्रात ढकलणे मोठेच आव्हान होते. वन विभागाचे अधिकारी, एमटीडीसीचे अधिकारी, जीव रक्षकांसह स्थानिक तज्ज्ञ व नागरिकांनी त्यासाठी प्रयत्न सुरु केले. वीस फुटांपेक्षा अधिक लांबी आणि पाच ते सहा टन वजन असलेल्या माशाला नेमके कसे समुद्रात ढकलावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. ओहोटी असल्यामुळे त्यातील अडचणींमध्ये भरच पडली होती. अखेर माशाला दोरीने बांधून बोटीने ओढून खोल समुद्रात सोडण्यात यश आले.
