
नवी दिल्ली NEWS DELHI : कोणत्याही नेटवर्कशिवाय स्मार्टफोनमध्ये डायरेक्ट टू होमप्रमाणेच सॅटेलाईटच्या आधारे लाईव्ह टीव्हीचे फिड उपलब्ध करण्याचा विचार सरकारच्या पातळीवर सुुरु आहे. मात्र, त्याला टेलिकॉम ऑपरेटर, चिप निर्माते, नेटवर्क प्रोव्हाईडर आणि मोबाईल निर्मात्या कंपन्या असा सर्वच स्तरावर विरोध दर्शवला आहे. (TV Content on Smartphone) सरकारच्या या निर्णयाला या चार क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारतात सध्या २१ ते २२ कोटी घरांमध्ये टीव्ही पोहोचला आहे तसेच ८० कोटी स्मार्टफोन यूजर्स आहेत. येत्या तीन वर्षात स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांची संख्या १०० कोटींवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यात इंटरनेट ट्रॅफिकपैकी ८० टक्के हे केवळ व्हिडिओचा आहे. यामुळेच मोबाईलवरच टीव्ही उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, या निर्णयाला विविध कंपन्यांकडून विरोध होतोय. यासाठी स्मार्टफोन मध्ये नवे तंत्रज्ञान वापरावे लागणार असून त्यामुळे स्मार्टफोनची किंमत किमान अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढू शकते, असे कंपन्यांनी म्हटले आहे. तर चीप तयार करणाऱ्या क्वालकॉम कंपनीने केवळ एकाच देशासाठी विशिष्ट प्रकारच्या चिप बनवणे कंपनीसाठी नुकसानकारक ठरणार असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाचा स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांवर देखील त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी भीती जवळपास सर्वच कंपन्यांनी दूरसंचार मंत्रालयास पत्र पाठवून व्यक्त केली आहे.
दरम्यान, या तंत्रज्ञानाचा टीव्हीच्या पलिकडेही वापर होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. टेलिव्हिजन चॅनल्ससोबतच शैक्षणिक आणि सामाजिक कंटेंट एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवता यावा तसेच आपातकालीन स्थितीमध्ये देशातील नागरिकांना एकाच वेळी अलर्ट देण्यासाठी देखील याचा वापर होऊ शकतो, असे सरकराच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागलेले आहे.