
मुंबई, 15 नोव्हेंबर : सहारा इंडिया ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या पार्थिवावर आज, बुधवारी उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथे अंत्यसंस्कार होतील. रॉय यांचे मंगळवारी रात्री मुंबईच्या रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 75 वर्षांचे होते.Subrata Roy cremated in Lucknow
सुब्रत रॉय यांचा जन्म बिहारच्या अररिया जिल्ह्यात 10 जून 1948 रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सुधीर चंद्र रॉय आणि आईचे नाव छवी रॉय होते. कोलकातामध्ये सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गोरखपूरमध्ये एका सरकारी कॉलेजमधून यंत्र अभियांत्रीकीचे शिक्षण घेतले होते. त्यांनी आपला उद्योग गोरखपूरमधूनच सुरु केला होता. सुब्रत रॉय 1970च्या दशकात स्कुटरने फिरायचे. त्याकाळी दिवसभरात 100 रुपये कमावणारे लोक त्यांच्याकडे 20 रुपये जमा करायचे. अशाप्रकारे लोकांकडून छोटी छोटी रक्कम गोळा करुन त्यांनी साम्राज उभारले आणि 1978 साली सहारा समूहाची सुरुवात करताना त्यांच्या खिशामध्ये फक्त 2000 रूपये होते.

सहारा समुहाने अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजना राबवल्या. दैनंदिन, मासिक, त्रैमासिक, वार्षिक ठेवी यासारख्या सेवा प्रदान करण्यात येत होत्या. इतर कंपन्या आणि बँकांच्या मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवींच्या तुलनेत, सहाराने 3-4 टक्के अधिक व्याज देऊ केले. सुमारे 11-12 टक्के वार्षिक व्याज देण्याचे आश्वासन दिले. लोकांना अनेक वर्षांचा परतावाही मिळाला. रॉय यांच्या नेतृत्वाखाली सहाराने अनेक व्यवसायांमध्ये विस्तार केला. रॉय यांचे साम्राज्य वित्त, रिअल इस्टेट, मीडिया आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांमध्ये पसरलेले आहे. त्यांनी 1991 मध्ये एअर सहारा एअरलाइनची स्थापना केली. 10 हजार एकरांवर पसरलेला ऍम्बी व्हॅली प्रकल्प हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. सहारा समूह हा टीम इंडियाचाही प्रायोजक होता. छोट्या शहरातून व्यवसाय सुरु करुन त्यांनी जगभरात आपल्या व्यवसाय पसरवला होता.