
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या तिन पक्षांमधील जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे दावे करण्यात येत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटामधील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी एकजूट करत ‘इंडिया आघाडी’ची स्थापना केली आहे. त्यानंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर स्थानिक पातळ्यांवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. (Lok Sabha Seat Sharing Formula)
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीही जागावाटपाची चर्चा सुरु आहे व ती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. जागावाटपात ठाकरे गट १९ ते २१, काँग्रेस १३ ते १५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट १० ते १२ जागा लढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. चार जागांवर अद्यापही चर्चा असून त्यावर मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, काँग्रेसमधील सूत्रांच्या मते पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतरच याबाबतीत स्पष्टता येईल. या निकालातून नेमका अंदाज येईल, असा नेत्यांचा दावा आहे.
मात्र, चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार मुंबईतील सहापैकी चार जागा ठाकरे गट तर दोन जागा काँग्रेस लढणार असल्याची माहिती आहे. विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, यवतमाळ-वाशिम, बुलडाणा, रामटेकबाबत या जागा यापूर्वी ज्या पक्षाने लढलेल्या आहेत, त्याच पक्षाकडे राहतील, असे संकेत आहेत. तर भंडारा-गोंदिया आणि अमरावतीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच राहण्याची शक्यता दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीत येण्याची धडपड सुरु असून त्यात यश आल्यास अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.