
मुंबई- राष्ट्रवादीचा अजित पवार AJIT PAWAR गट लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ९ लोकसभा मतदारसंघांसाठी आग्रही असल्याची माहिती असून त्या मतदारसंघांची यादीही पुढे आली आहे. या मतदारसंघांमध्ये सध्या भाजपकडे असलेल्या विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असल्याची माहिती आहे. या मतदार संघातील संभाव्य उमेदवारांची यादीही समोर आली असून भंडारा-गोंदियासाठी प्रफुल्ल पटेलांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा घटकपक्ष असलेल्या अजित पवार गटाने देखील कंबर कसली आहे. महायुतीमध्ये लोकसभेच्या नऊ जागांसाठी अजित पवार यांनी आग्रही मागणी केली आहे. राष्ट्रवादीकडे आधी असलेल्या चार जागांसह अतिरिक्त पाच जागांची मागणी अजित पवार गटाने केली असून यात शिवसेनेच्या ठाकरे गट व भाजपकडील जागांचाही समावेश आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार जागा आहे. यामध्ये बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. या व्यतिरीक्त अजित पवार गटाच्या वतीने धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगर या पाच लोकसभा मतदार संघाची मागणी केली आहे.