
मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढण्याचा इशारा दिलाय. राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली असून हा मुद्दा निकालात न निघाल्यास आंदोलनाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिलाय.
धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाला ५० दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे. मात्र, या मुद्द्यावर शासकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाली दिसत नाहीत. फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी असल्याची बहुजन समाजाची धारणा आपल्याबद्दल होत असल्याचे आमदार पडळकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारच्या नेतृत्त्वात धनगर आरक्षणाची अंमलबाजवणी होईल, अशी धनगरांना आशा असून त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत. समित्या गठित करून धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. ही भावना सामान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे. आपण वेळीत योग्य पावले उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा, असेही पडळकर म्हणाले.
