“गावबंदी करता? सात-बारावर महाराष्ट्र लिहून दिलाय का?”: भुजबळ कडाडले

0

जालना JALNA : जालना जिल्ह्यातील अंबड येथे आयोजित ओबीसी आरक्षण एल्गार सभेत बोलताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आज जोरदार टीका केली. राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना गावबंदी करण्यासाठी महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला आहे का? असा संतप्त सवाल भुजबळ यांनी जरांगे यांना उद्देशून केला. याद राखा, माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस, असा इशाराही भुजबळ यांनी यावेळी आपल्या आक्रमक भाषणात दिला.

अंबड येथे पार पडलेल्या या ओबीसी एल्गार सभेत सर्वच पक्षांचे ओबीसी नेते सहभागी झाले होते. मात्र, भुजबळ यांचे भाषण अतिशय आक्रमक होते. भुजबळ म्हणाले, पोलिसांना माझे आवाहन आहे की, हे गावागावात लावलेले गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचे राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माझे सांगणे आहे. आज आमदार, राजकीय नेते गावात यायचे नाही म्हणजे काय. हे असं यापुढे चालणार नाही. सरकार आहे की नाही? कायदा आहे की नाही? तुम्ही जर असा पक्षपातीपणा कराल तर ओबीसी देखील गप्प बसणार नाही. ओबीसींच्या जोडीला दलित-मुस्लीम-आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही. ही दादागिरी बंद करु, असेही यावेळी भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले, मला तर रोज धमक्या, शिवीगाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवीगाळ होतेय. पोलिसांना तक्रार केली तरी काही होत नाही. बस येऊन जाऊन येवल्यात कसा निवडून येतो ते बघतो, असे म्हणतात. काहीजण मला म्हणतात भडकाऊ भाषण नका करु? पण मी कधी भडकाऊ भाषण केले. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ३० वर्षे मराठ्यांसोबत राहिलो व कधी त्यांचा द्वेष केला नाही. पण त्यांनी केलेलं चालतं का?, अशा शब्दांत छगन भुजबळांनी भूमिका मांडली.

टोपे, पवारांनी जरांगेंना आणलं

आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या घरात जाऊन झोपले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे व रोहित पवार यांनी त्यांना उठवून उपोषण स्थळी नेऊन बसवले, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केला.
छगन भुजबळ म्हणाले, न्यायमूर्ती त्यांना सर सर म्हणत होते. तो पाचवी पास तरी आहे का? हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मिळावे झाले पाहिजेत. ओबीसींची संख्या जास्त असून महाराष्ट्रातही जातीय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

पोलिसांचे मनोबल खचले

भुजबळ म्हणाले, पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला. पण ७० पोलिस रुग्णालयात जखमी झाले, ते कोणी पाहिले नाही. पोलीस यांना उठवायला गेले तेव्हा, त्यावेळी जरांगे यांनी सर्व तयारी केली होती. पोलिसांवर दगडाचा मारा सुरु झाला. ७० पोलीस काय पाय घसरून पडले होते का? छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवलं. तेथे महिला पोलिसांवर दगडफेक झाली. लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार घरात जाऊन बसले होते. राज्यापुढे खरे चित्र आले नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनीच माफी मागितली आणि गुन्हे मागे घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे पोलिसांचे मनोबल खचले, असेही भुजबळ म्हणाले.

बीडमध्ये प्रकाश सोळुंकेचे घर जाळले. त्यामागे एक ग्रुप नव्हता. कोड नंबर देण्यात आले होते. त्या ठिकाणी कोयते, चॉपर सापडले, पेट्रोल बॉंब सापडले. राखरांगोळी शब्द म्हणजे काय असतो, हे मी त्या दिवशी बीडमध्ये पाहिले. संदीप क्षीरसागर यांचे घर जाळले गेले. त्यानंतर राऊतचे हॉटेल जाळले. जयदत्त क्षीरसागर, संदीप सागर यांच्या घरात पेट्रोल बॉंब टाकले. त्यांची लेकरे बाळे पण घरात होती, असेही भुजबळ म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा