
नागपूर – आज रविवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोण जिंकणार ? याचा फैसला आता काही तासातच होणार असून विश्वचषकाचा दावेदार भारतीय संघाने या स्पर्धेत प्रथमच सर्वबाद 240 धावा केल्याने चाहत्यांची निराशा झाली असली तरी ऑस्ट्रेलियन संघाला देखील हे 241 धावांचे लक्ष्य सोपे नसल्याचे जाणकार सांगत आहेत. पहिल्या तासात भारतीय गोलंदाजांवर या सामन्याची, भारताची मदार अवलंबून असणार आहे.
संयमी के.एल.राहुलच्या 64 धावा,कर्णधार रोहित शर्माने झटपट केलेल्या 48 धावांची खेळी सोडता इतर फलंदाज अपयशी ठरले. विराट कोहलीचे लवकर बाद होणे, सुर्यकुमार यादवला शेवटच्या षटकात साथीदार न मिळणे आणि महत्वाचे म्हणजे अचूक गोलंदाजी आणि किमान 40 धावा रोखणारे चपळ क्षेत्ररक्षण, रोहित शर्माचा अप्रतिम झेल ही ऑस्ट्रेलियन संघासाठी जमेची बाजू ठरली. फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया विजेतेपदासाठी झुंजणार म्हटल्यावर स्टेडियम हाऊसफुल आहे. देशभरात भारतीय संघासाठी चाहत्यांनी होमहवन, पूजा अर्चना केली. कुठे ढोलताशा वाजवत तर कुठे मोठ्या स्क्रीनवर सामन्याचा थरार अनुभवत चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. भारताने न्यूझीलंडचा पराभव करीत तर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रचंड संघर्ष करीत दक्षिण आफ्रिकेचा ३ गडी राखून पराभव करुन फायनलमध्ये प्रवेश मिळविला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी फायनलमध्ये विश्वविजेतेपदासाठी यजमान भारताचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होत आहे. जलदगती मो शमी,रवींद्र जडेजाच्या फिरकीवर भारताची भिस्त असून देशविदेशातील सेलिब्रिटीच्या उपस्थितीत होणारी ही लढत उत्कंठावर्धक होणार आहे.
