
कोल्हापूर : मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी प्रामुख्याने उपस्थित असून कोल्हापुरातून हातकणगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रस्ता रोको करत चक्का जाम आंदोलन करण्यात आले असून जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उसाचे एक कांडके देखील कारखान्याला जाऊ देणार नाही आणि हे पैसे घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अंकली टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते, आदी ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे. तर सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, बीड, लातूर, नंदूरबार, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यासह संपूर्ण ऊस पट्ट्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.