
पुणे 19 नोव्हेंबर बागेश्वर बाबा हे सातत्याने भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वांशी विसंगत असे अशास्त्रीय दावे आणि भाष्य करत आहेत. या घटनाविरोधी दाव्यांमुळे राज्य सरकारने त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक ॲक्ट आदी कायद्यांनुसार त्वरित कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील संतांविषयी बागेश्वर बाबा हे बदनामीकारक, अब्रुनुकसानकारक वक्तव्य करत आहेत. या वक्तव्यांच्या जोडीलाच ते अशास्त्रीय दावे करू लागले आहेत. त्यांच्या या अशास्त्रीय दाव्यांची उकल करून समाजात शास्त्रीय विचारधारा रुजविण्यासाठी राज्य सरकारने प्रसारमाध्यमे, शिक्षण संस्थांमार्फत खास जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणीही ‘अंनिस’चे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी केली. यावेळी ‘अंनिस’चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सम्यक वि. म., जिल्हा पदाधिकारी एकनाथ पाठक आणि प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.
