मराठा-ओबीसी वादाला भाजपा सरकारच जबाबदार : पटोले

0
NANA PATOLE

 

मुंबई MUMBAI : महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे, शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत परंतु राज्यातील तिघाडी सरकारी त्याकडे लक्ष देत नाही. जनतेच्या ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजात वाद सरकार निर्माण करत आहे. राज्यातील अशांततेला एक-दोन मंत्री नाहीतर सर्व सरकारच जबाबदार असून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात आग लावून सरकार मजा पहात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पटोले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अशांतता निर्माण करुन ‘जळता महाराष्ट्र’ करुन ठेवला आहे, हे अत्यंत निषेधार्ह असून राज्य जळत असताना सरकार मात्र मजा बघत आहे. सरकारमधील मंत्रीच सामाजिक शांतता भंग होईल, अशी चिथावणीखोर विधाने करत आहेत. या मागे सरकारच आहे व राज्यपाल महोदयांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला पाहिजे. आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप हे भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. २०१४ साली भाजपा व फडणवीस यांनीच आरक्षणाचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली व मागील ९ वर्षात भाजपाने कोणत्याच समाजाला आरक्षण दिले नाही. आरक्षणाच्या नावाखाली समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम केले आहे. काँग्रेस पक्ष जर राज्यात व केंद्रात सत्तेत आला तर आरक्षण प्रश्नावर मार्ग काढू. आरक्षण प्रश्नावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांनी ती जाहीरपणे मांडलेली आहे. जातनिहाय जनगणना करणे व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यास त्यावर निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा