
नाशिक: मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना भाषणाची स्क्रिप्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लिहून दिली व त्यामुळेच मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला असल्याचा आरोपी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. त्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आहे. मला कधी शरद पवारांनी आणि अजितदादांनीही स्क्रिप्ट दिली, असे भुजबळ म्हणाले. ओबीसींचे स्क्रिप्ट हे मंडल आयोग, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न आंबेडकर यांचे स्क्रिप्ट आहे, असे भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले, राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठिशी आहे. मी एकटा पडलेलो नाही. काही नेते मंडळीची अडचण झाली असेल. माझी काही हरकत नाही, माझ्या स्टेजवर येऊ नका स्वतंत्र बैठक घ्या. ओबीसी आरक्षणचा बचाव करणे ही तुमची आणि माझी भूमिका एकच आहे. त्यामुळे तुम्ही रॅली घ्या, बैठक घ्या पण ओबीसीचा लढा सुरू ठेवा. ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात काही नेते माझ्या सोबत येतील काही जातील हे चालूच राहणार आहे. या लोकांनी त्यांचे मन अंबडच्या सभेत मोकळे केले आहे. कुठेही जा पण ओबीसीसाठी लढा, माझ्या विरोधात बोलले तरी चालले,पण ओबीसीच्या बाजूने बोला, असे भुजबळ म्हणाले.
